धुळे – महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धुळे यांच्यातर्फे 2023-24 व 2024-25 या वर्षांसाठी जिल्हा क्रीडा पुरस्कार तसेच युवक, युवती व संस्थांसाठी जिल्हा युवा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. हा पुरस्कार महाराष्ट्र दिनानिमित्त 1 मे 2025 रोजी सकाळी 8 वाजता पोलीस कवायत मैदान, धुळे येथे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी 2023-24 मध्ये वुशू खेळातील महिला गुणवंत खेळाडू म्हणून पूर्वा दिलीप निकम यांची, तर कबड्डीतील गुणवंत क्रीडा मार्गदर्शक म्हणून राजेंद्र बळीराम शिंदे यांची निवड झाली आहे. 2024-25 साठी मैदानी खेळातील पुरुष गुणवंत खेळाडू म्हणून प्रथमेश अमरीश देवरे, महिला गुणवंत खेळाडू म्हणून अनुराधा दिलीप चौधरी (वुशू), दिव्यांग गुणवंत खेळाडू म्हणून राहुल ईश्वर बैसाणे (रायफल शूटिंग) आणि मैदानी खेळातील गुणवंत क्रीडा मार्गदर्शक म्हणून सुकदेव गोरख भिल यांची निवड झाली आहे.
जिल्हा युवा पुरस्कारांतर्गत 2022-23 साठी युवती म्हणून ॲड. शितल जावरे यांची निवड झाली आहे. 2023-24 साठी युवक म्हणून सागर राजेंद्र पटेल व युवती म्हणून सुवर्णा भालचंद्र देसले यांची निवड झाली आहे. तर 2024-25 साठी युवक म्हणून प्रकाश शरद पाटील, युवती म्हणून वृदावना भीमराव पाटील यांची निवड करण्यात आली असून, संस्थात्मक पुरस्कारासाठी इंदिरा महिला मंडळ, वलवाडी (अध्यक्षा – प्रभा परदेशी) या संस्थेची निवड झाली आहे.
या पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम असून, गुणवंत खेळाडू व युवक-युवतींना 10,000 रुपये आणि संस्थेस 50,000 रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली असून, सर्व पुरस्कार विजेत्यांचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील अधिकारी व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
