आ.काशीराम पावरा, आ.मंजुळा गावित यांच्यासह लोकप्रतिनिधींचा प्रत्यक्ष सहभाग
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून धुळे जिल्ह्यात दिनांक १ मे २०२५ रोजी “कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू!” या विशेष अभियानाची सुरुवात लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली . या अभियानाच्या निमित्ताने शिरपूरचे आमदार काशीराम पावरा साक्रीच्या आमदार मंजुळा गावित यांनी स्वच्छता अभियानाच्या या उपक्रमात प्रत्यक्ष सहभाग नोंदवून ग्रामस्थांनी देखील सहभागी व्हावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले .
राज्य शासनाच्या पाणी व स्वच्छता विभागामार्फत जिल्ह्यात दिनांक 1 मे 2025 पासून कंपोस्ट खड्डा भरू, आपले गाव स्वच्छ ठेवू, हे अभियान राबविण्याच्या सूचना होत्या. त्या अनुषंगाने धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी अभियान राबविण्यास प्रारंभ करण्यात आला.
अर्थे बुद्रुकला आ. पावरा यांची उपस्थिती
शिरपूर तालुक्यातील अर्थे बुद्रुक येथून या अभियानाला सुरुवात करण्यात आली. शिरपूरचे आमदार श्री काशीराम दादा पावरा यांच्या हस्ते अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर तुषार रंधे, शिरपूरचे गटविकास अधिकारी प्रदीप पवार, गावाच्या सरपंच मनीषा पाटील, सामाजिक कार्यकर्ते मनोहर पाटील ,विस्तार अधिकारी बी सी सोनवणे, ग्रामविकास अधिकारी बीपिन देवरे, अतुल निकम समीर तडवी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. याप्रसंगी आमदार पावरा यांनी स्वच्छता अभियानाच्या उपक्रमात प्रत्यक्ष सहभाग नोंदवत उपस्थितांचा उत्साह वाढविला. तसेच हे अभियान यशस्वी करण्यासाठी लोकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन देखील केले. यावेळी शिरपूरचे गटविकास अधिकारी तथा पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री प्रदीप पवार यांनी प्रास्ताविकातून अभियानाच्या संदर्भात माहिती देताना सांगितले की, स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत जिल्हा हागणदारी मुक्त अधिक आदर्श करणे हे उद्दिष्ट आहे. गावात शाश्वत स्वच्छता टिकली पाहिजे आणि स्वच्छता हा लोकांचा संस्कार बनला पाहिजे यासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून हे अभियान राबविण्यात येत आहे . सदर अभियान १ मे ते ३० सप्टेंबर २०२५ या १३८ दिवसांच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे. यामागचा उद्देश ग्रामीण भागात स्वच्छता व सेंद्रिय कचऱ्याचे पर्यावरणपूरक व्यवस्थापन करणे हा आहे. दि. १ मे ते १० मे 2015 या काळात संकलित केलेला ओला कचरा नाडेपमध्ये ओला कचरा,शेण व बारीक माती यांचा वापर करून शास्त्रोाक्त् पध्दतीने भरण्यात येणार आहे. या कचऱ्यापासून साधारणता 120 दिवसात तयार झालेले खत हे दि.१ ते १५ सप्टेंबरदरम्यान नाडेपमधून बाहेर काढले जाणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी ग्रामस्थांनी देखील कचऱ्याचा घरगुती व सार्वजनिक स्तरावर व्यवस्थापन करण्याचा निर्धार केला.
साक्री तालुक्यात अभियानाचा शुभारंभ
साक्री तालुक्यातील दातर्ती येथे सदर अभियानाचा शुभारंभ आमदार सौ. मंजुळाताई गावित यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे, सरपंच श्रीमती चंद्रकला चौधरी, उपसरपंच योगेश पवार, माजी पंचायत समिती सदस्य भिकचंद टाटिया, ग्रामपंचायत अधिकारी जितेंद्र बोरसे, श्री राजेंद्र महावीर, क्षमता बांधणी तज्ञ श्री मनोज जगताप मनुष्यबळ विकास सल्लागार दीपक देसले आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना आ. मंजुळाताई गावित यांनी कंपोस्ट खड्डा याचे महत्त्व अधोरेखित केले. कंपोस्ट खड्ड्यातून निर्माण होणारे सेंद्रिय खत आपल्या शेतीसाठी खूप उपयोगाचे आहे, शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर केल्याने निर्माण होणारे वेगवेगळे आजारांबाबत सखोल मार्गदर्शन केले. कंपास खड्डा भरू या अभिनव उपक्रमात गावातील कचरा नष्ट होऊन गावात स्वच्छता नांदण्यास सुरुवात होईल व या अभियानात ग्रामपंचायत तसेच सर्व गावातील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन केले.
गटविकास अधिकारी सोनवणे यांनी अभियानाची सुरुवात व कालावधी , त्यातील विविध टप्पे याबाबत मार्गदर्शन केले. कंपोस्ट खड्ड्याचे महत्व व त्याचा वापर कशा पद्धतीने करावा आणि त्याची शास्त्रोक्त पद्धत याबाबत मार्गदर्शन केले व ग्रामस्थांनी या अभिनव उपक्रमामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आंबोडे येथे तालुकास्तरीय शुभारंभ
कंपोस्ट खड्डे भरू, गाव स्वच्छ ठेवू या अभियानाचा तालुकास्तरीय शुभारंभ आंबोडे येथे झाला. गटविकास अधिकारी गणेश चौधरी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. अध्यक्षस्थानी सरपंच जिजाबाई गर्दे होत्या. यावेळी अभियानाबाबत विस्तृत माहिती समाजशास्त्रज्ञ दीपक पाटील यांनी दिली. गावातील सार्वजनिक स्वच्छतेच्या स्थळांची पाहणी करण्यात आली. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या उपभियंता प्रियंका बेहेरे, उपसरपंच गुलाब रखमे,ग्रामपंचायत अधिकारी सारिका परदेशी, सदस्य योगेश थोरात, महेश गर्दे, विनोद बागले,दिनेश गर्दे, राजेंद्र यादव,काळू वाघ, नाना सरग, काशिनाथ सरग, मुख्याध्यापक उमाकांत पाटील, नयना बरकले, संवाद सल्लागार अरुण महाजन, गट समन्वयक संकल्प करडक आदी उपस्थित होते.
परसामुळे येथे अभियानाचा शुभारंभ
शिंदखेडा तालुक्यातील परसामळ येथे गटविकास अधिकारी रावसाहेब वाघ यांच्या उपस्थितीत अभियानाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमासाठी धुळे जिल्हा कृषी अधिकारी सिताराम चौधरी वाघ व देवरे कृषी विस्तार अधिकारी, शिंदखेडा पंचायत समिती अनुराधा जाधव उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी वाडीले भाऊसाहेब व गावातील माजी जिल्हा परिषद सदस्य जयसिंग भगवानसिंग गिरासे, लोकनियुक्त सरपंच कलाबाई साहेबराव नगराळे, उपसरपंच सौ. ललिता दिनेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य किरण प्रकाश कोळी, ग्रामपंचायत सदस्य कोमलसिंग भगवानसिंग गिरासे, ग्रामपंचायत कर्मचारी गोकुळसिंग दिवाणसिंग गिरासे व दीपक ठाणसिंग गिरासे संगणक परिचालक प्रकाश भोजू कोळी व अंगणवाडी सेविका उपस्थित होते. यावेळी श्री वाघ म्हणाले की, गावातील शाश्वत स्वच्छता कायम राहावी हा अभियानाचा उद्देश असून तो यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
