नाशिक शहरात शनिवारी सायंकाळी एक भीषण अपघात घडला आहे. भरधाव वेगात असलेल्या पिकअपने चार वाहनांना धडक दिल्याने एक तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असून पोलिसांनी पिकअप चालकाला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जयश्री सोनवणे ही तरुणी आपल्या भावासोबत दुचाकीवरून जात होती. दरम्यान, मागून भरधाव आलेल्या पिकअपने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे दोघेही रस्त्यावर फेकले गेले. या घटनेत जयश्री सोनवणे हिला गंभीर दुखापत झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. तिचा भाऊ सुमित सोनवणे गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
अपघात यतिच थांबला नाही. पुढे जाऊन त्या पिकअपने आणखी दोन दुचाकी आणि एका चारचाकी वाहनाला धडक दिली. यामध्ये दोन तरुण जखमी झाले असून त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पिकअप वाहन आणि चालकाला ताब्यात घेतले आहे. चौकशीदरम्यान चालकाने दिलेली माहिती धक्कादायक ठरली. त्याने सांगितले की, “वाहन चालवताना माझा मुलगा मांडीवर बसला होता. त्याने चुकून अॅक्सेलेरेटरवर पाय दिल्याने गाडीचा वेग वाढला आणि अपघात झाला.” मात्र प्रत्यक्षदर्शींच्या मते, चालक नशेत होता.
