स्थानिक गुन्हे शाखेने केली मोठी कामगिरी
धुळे जिल्ह्यात सुपारीच्या अवैधरित्या वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तब्बल २.५२ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. महाराष्ट्रातील विविध ठिकाणांवरून अवैध माल घेऊन जाणाऱ्या ७ वाहनांना ताब्यात घेण्यात आले असून, कोणतीही कायदेशीर कागदपत्रे नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार धुळे जिल्ह्यात ३० एप्रिल रोजी नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय बातमीदाऱ्यामार्फत माहिती मिळाली की, कर्नाटक राज्य पासिंगचे सात ट्रक वाहनांमधून नागपूरहून गुजरातकडे जाणाऱ्या मार्गावर अवैध सुपारीची वाहतूक होत आहे. या माहितीनुसार पोउनि अमरजित मोरे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावरील मोहाडीनगर व साक्री पोलीस ठाण्याच्या हद्दीत सातही ट्रक अडवले. वाहन तपासणी दरम्यान वाहनचालकांनी दिलेल्या माहितीवरून त्यांनी नागपूरहून सुपारी भरून गुजरात राज्यात वाहतूक सुरू असल्याचे कबूल केले. परंतु, मालासंबंधी कोणतेही ई-वे बिल, GST बिल किंवा मालाची कायदेशीर पावती त्यांनी सादर केली नाही.
सदर मालाचा दर्जा व कायदेशीरता तपासण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग, धुळे आणि केंद्रीय वस्तू व सेवा कर (GST) विभाग, नाशिक यांच्या अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून घटनास्थळी बोलावण्यात आले. त्यांच्याकडून पंचनामा करण्यात आला.
धुळ्यात पकडलेल्या ५ वाहनांतून १ लाख ३६,८६९ किलो सुपारी जप्त करण्यात आली. तिची
किंमत: १ कोटी ४२ लाख ३४ हजार ३६० रुपये इतकी आहे. तसेच साक्री येथील २ वाहनांतून८ लाख ५८,१०४/- रुपये किमतीची ८,२५१ किलो सुपारी
जप्त करण्यात आली, या ७ ट्रक वाहनांची एकूण अंदाजित किंमत १ कोटी ५,लाख इतकी आहे. मोबीन सुलेमान, भुरा मोहम्मद सामीन, धरमपाल यादव, जफरोद्यीन नूर मोहम्मद, मुखीम खान इलीयास, फकीर अल्लाबक्ष पठाण (रा. करमाळा, सोलापूर), राहुल सोमाभाई जाट (रा. अंजार, गुजरात) अशी या ट्रक चालकांची नावे आहेत. पोलिसांनी ट्रक सह २ कोटी ५२ लाख ९२,४६४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, धुळे यांच्या पथकाने केली. या कारवाईत पोनि श्रीराम पवार, पोउनि अमरजित मोरे, असई संजय पाटील, पोहेको सदेसिंग चव्हाण, प्रशांत चौधरी, दिनेश परदेशी, तुषार सूर्यवंशी, पंकज खैरमोडे, महेंद्र सपकाळ, हर्षल चौधरी, किशोर पाटील, अमोल जाधव, कैलास महाजन यांचा समावेश होता.