धुळे तालुक्यातील शिवसेनेचे माजी आमदार तथा नंदुरबारजिल्हा संपर्कप्रमुख प्रा.शरद पाटील यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा ना.अजित पवार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईत आज ३ मे रोजी हा प्रवेश सोहळा झाला. प्रा. शरद पाटील यांनी दुसऱ्यांदा शिवसेना सोडली.
धुळे तालुक्यातील कुसुम्ब गावात एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरी करणाऱ्या शरद पाटील यांनी सन २००४ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला.सन २००९ मध्ये ते शिवसेनेच्या तिकिटावर या मतदार संघात आमदार झालेत. त्यानंतर मात्र त्यांच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा लागली. राजकीय समीकरणे बदलल्याने त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला मात्र अल्पावधीत काँग्रेस सोडून पुन्हा हाती शिवबंधन बांधले. पक्षनेतृत्वाने त्यांच्यावर नंदुरबार जिल्हासंपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी सोपवली परंतु नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत धुळे शहरातून शिवसेनेतर्फे निवडणूक लढण्यास इच्छुक असणाऱ्या प्रा. शरद पाटील यांचे तिकीट कापले गेल्याने तेव्हापासून ते नाराज होते. अखेर त्यांनी शिवसेनेला सोडचिठी देऊन आता राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केलाय..
प्रा. शरद पाटील म्हणाले..
प्रवेशानंतर मंचावरून ना. अजित पवारांच्या उपस्थितीत मनोगत मांडताना प्रा. शरद पाटील यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. ते म्हणाले,’ तारुण्यात एस काँग्रेस मध्ये काम करून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. दुर्दैवाने अजित दादांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली नाही. परंतु त्यांच्या कामाची शैली संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. मी आमदार असताना विरोधी पक्षात असतानाही सत्तेत असलेल्या दादांनी अक्कलपाड्यासाठी निधी दिला म्हणून हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला. आपल्या आयुष्यात सत्ताधाऱ्यांशीच संघर्ष करावा लागल्याने राजकीय आयुष्य जिवंत राहिले नाही. परंतु दादांसारख्या नेत्यांमुळे आम्हा शेतकऱ्यांच्या मुलांना पुन्हा नव्याने कामाची संधी मिळते आहे. आयुष्याची सहासष्ट वर्ष कशी निघून गेलीत हे कळले नाही परंतु उर्वरित काळात दादांच्या नेतृत्वात काम करण्याची तीव्र इच्छा असल्यामुळेच आपल्यासोबत आलो. तापी पांझरेवरील प्रकल्पाना बळ द्या. धुळ्यात कृषी विद्यापीठ बनवण्याचे स्वप्न साकार करा असे सांगतानाच.. दादा तुम्ही खानदेशचे पालकत्व स्वीकार अशी इच्छाही प्रा. शरद पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
