पुणे : पिंपरी-चिंचवड व पुणे जिल्ह्यातील निगडी, प्राधिकरण येथे खान्देश मराठा मंडळाचा ३९ वा वर्धापन दिन १ मे रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्याची उजळणी करताना विविध मान्यवरांचा सन्मानही करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात “जय जय महाराष्ट्र माझा” या स्वागतगीताने झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प. किसन महाराज पांडुरंग चौधरी सर उपस्थित होते. त्यांनी खान्देश प्रदेशाच्या वैभवशाली परंपरेवर भाष्य करत, कवी, लेखक, क्रांतिकारक व ‘अहिराणी’ बोलीभाषेचे महत्त्व विशद केले. तसेच महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष हेमंत चव्हाण होते. त्यांनी प्रमुख पाहुण्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला. तसेच खान्देशचे सुपुत्र कवी अभिमन्यू गिरधर सूर्यवंशी निमडाळेकर यांचाही गौरव करण्यात आला. मंडळातील UPSC, MPSC व Doctor अशा शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील सत्कार झाला.
मंडळाच्या मागील वर्षात मयत झालेल्या सभासदांना व पहेलगाम येथील हल्ल्यात मृत्यू पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शशिकांत बेहेरे यांनी केले, तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय अनिल पाटील यांनी करून दिला. सूत्रसंचालन राजेंद्र देसले यांनी केले आणि आभार प्रदर्शन रमाकांत पाटील यांनी केले.
कार्यक्रमाची सांगता “स्वरांगणा” या दृष्टीहीन संस्थेच्या सुमधुर गाण्यांच्या कार्यक्रमाने झाली. यानंतर सर्व उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष हेमंत चव्हाण, प्रदीप शिंदे, किशोर पाटील, मनोहर पाटील, राजेंद्र देसले, हेमंत पाटील, मधुकर पगार, जितेंद्र नारायण पाटील, सुरेश पाटील, मोतीलाल पाटील, बाळासाहेब पाटील, दिपालीताई पाटील, राखीताई निकम व मार्गदर्शक भगवान केशव पाटील यांचे मोलाचे योगदान लाभले.
