राजस्थानमधील बागीदौरा येथील भारत आदिवासी पक्षाचे आमदार जयकृष्ण पटेल यांना २० लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. खाणकाम विषयक प्रश्न विधानसभेतून हटवण्यासाठी त्यांनी एका कंपनीकडून तब्बल १० कोटींची मागणी केल्याचा गंभीर आरोप आहे. राजस्थान भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने (ACB) या प्रकरणात कारवाई करत आमदाराला अटक केली आहे.
कंपनीकडून तडजोडीतून सुरू झाला लाचखोरीचा खेळ
जयकृष्ण पटेल यांनी संबंधित कंपनीला काम न करू देण्यासाठी सातत्याने अडथळे निर्माण केले होते. त्यानंतर तडजोडीअंती आमदाराने अडीच कोटी रुपये मागितल्याची माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी ४ एप्रिल रोजी तक्रारदार रविंद्र सिंग यांनी ACB मध्ये तक्रार दाखल केली होती.
एसीबीचा सापळा आणि ठोस पुरावे
तक्रारीनंतर ACB ने सापळा रचला. पहिल्या टप्प्यात आमदाराला एक लाख रुपये देण्यात आले. त्यानंतर जयपूरमधील आमदार निवासस्थानी २० लाख रुपयांचा पुढील हफ्ता देण्यात येणार होता. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी नोटांवर विशेष शाई लावली होती आणि संपूर्ण व्यवहाराचे ऑडिओ, व्हिडीओ व फोटोग्राफिक पुरावे गोळा केले.
संपूर्ण कारवाईदरम्यान आमदार पटेल स्वतः बॅग घेताना दिसले असून, त्या बॅगवर त्यांचे बोटांचे ठसेही आढळले आहेत. या सर्व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे ACB ने आमदाराविरोधात कारवाई केली आहे. पैसे घेणारा आणखी एक व्यक्ती घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा व्हिडीओ पुरावा ACB कडे आहे.
जयकृष्ण पटेल यांचा राजकीय प्रवास
जयकृष्ण पटेल हे बांसवाडा जिल्ह्यातील कानेला गावचे रहिवासी असून, २०२३ च्या पोटनिवडणुकीत बागीदौरा मतदारसंघातून भारत आदिवासी पक्षाकडून निवडून आले होते. त्यांनी भाजपचे उमेदवार सुभाष तंबोलिया यांचा तब्बल ५० हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता. ही जागा काँग्रेसचे आमदार महेंद्रजीत मालवीया यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झाली होती.
सध्या राजस्थान विधानसभेत भारत आदिवासी पक्षाचे ४ आमदार आहेत. जयकृष्ण पटेल यांच्यावरील ही कारवाई पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.