धुळे जिल्ह्यात प्रशासनाची तत्परता; भाटपुरा येथे अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात यश

शिरपूर तालुक्यातील भाटपुरा गावात एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून हा बालविवाह रोखण्यात यश मिळवले आहे. ही माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजेंद्र भामरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

बालविवाहासंदर्भात माहिती 5 मे रोजी चाईल्ड हेल्पलाईन 1098 वर प्राप्त झाली. त्यानंतर धुळे येथील चाईल्ड हेल्पलाईनचे सुपरवायझर महेंद्र चव्हाण व केसवर्कर संदीप पवार यांनी तत्काळ कारवाई करत स्थानिक ग्रामसेवक, पोलिस पाटील, सरपंच आणि अंगणवाडी सेविकांना माहिती दिली. तसेच डायल 112 वरून थाळनेर पोलिस ठाण्याशी संपर्क साधून पोलिसांचे सहकार्य घेण्यात आले.

प्रशासनाच्या पथकाने गावात पोहोचून बालविवाह थांबवण्याचा प्रयत्न केला असता काही विरोध झाला. मात्र पोलिसांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 अंतर्गत कारवाईचा इशारा दिल्यानंतर संबंधित दोन्ही कुटुंबीयांनी विवाह थांबवण्यास सहमती दर्शवली.

यानंतर संबंधित मुलीच्या कुटुंबीयांना बाल कल्याण समिती, धुळे येथे हजर करून त्यांना समुपदेशन देण्यात आले. समितीच्या अध्यक्षा डॉ. उषा साळुंखे, प्रा. सुरेखा पाटील आणि अ‍ॅड. अनिता भांबरे यांनी बालविवाहाचे दुष्परिणाम स्पष्ट केले. कुटुंबीयांनी मुलगी 18 वर्षांची होईपर्यंत विवाह न करण्याचे हमीपत्र लिहिले.

या संपूर्ण कारवाईत ग्रामसेवक एम.एस. पेंढारकर, पोलिस पाटील एकनाथ राठोड, सरपंच श्रावण चव्हाण, अंगणवाडी सेविका तसेच चाईल्ड हेल्पलाईनच्या प्रतिनिधींचा सक्रिय सहभाग होता. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सतिष चव्हाण आणि प्रकल्प समन्वयक प्रतिक्षा मगर यांचे मार्गदर्शन मिळाले.

प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे की, कुठेही बालविवाह होत असल्याचे निदर्शनास आल्यास टोल फ्री चाईल्ड हेल्पलाईन 1098 वर तातडीने संपर्क साधावा. तक्रारकर्त्याची माहिती गोपनीय ठेवली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top