आ.अनुप अग्रवाल यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मांडली गंभीर स्थिती
धुळे जिल्हा रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून एमआरआय मशिन उपलब्ध नसल्याने हजारो रुग्ण योग्य निदान आणि उपचारांपासून वंचित राहत आहेत. ही गंभीर बाब लक्षात घेत धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे तातडीने एमआरआय मशिन उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा सर्वोपचार रुग्णालय आणि जुन्या जिल्हा रुग्णालयात धुळेसह मालेगाव, चाळीसगाव, पारोळा, अमळनेर, नंदुरबार आदी भागातील रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. याशिवाय सात राष्ट्रीय महामार्ग या जिल्ह्यातून जात असल्याने अपघातांची संख्याही लक्षणीय आहे. मात्र, एमआरआय मशिन नसल्याने गंभीर रुग्णांची अत्यावश्यक तपासणी करणे अशक्य होत आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार अग्रवाल यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन देताना परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगितले. “केवळ एमआरआय मशिन उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयात जाऊन हजारो रुपये खर्च करून तपासणी करावी लागत आहे. अनेक रुग्ण वेळेत निदान व उपचाराअभावी जीव गमावत आहेत,” असे अग्रवाल यांनी निदर्शनास आणून दिले.
एमआरआय मशिन उपलब्धतेसाठी यापूर्वीही अनेकांनी पाठपुरावा केला होता, मात्र अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही. एबी फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरवताना अनेक रुग्णांनी या सुविधेच्या अभावाची तक्रार केली होती. त्यानंतर आमदार अग्रवाल यांनी शासनाकडे सातत्याने मागणी केली आहे.
या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेत तातडीने कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे. आता एमआरआय मशिन किती लवकर उपलब्ध होते, याकडे रुग्णांचे लक्ष लागून आहे.

