आमदार अनुप अग्रवाल यांच्या पाठपुराव्याला यश, कोल्हापूरच्या ‘सोसायटी फॉर ॲनिमल प्रोटेक्शन’ संस्थेची नियुक्ती
धुळे शहरातील मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या त्रासामुळे हैराण झालेल्या धुळेकरांसाठी दिलासादायक पाऊल उचलण्यात आले असून, धुळे महापालिकेतर्फे मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण आणि अँटी रेबीज लसीकरण मोहीम गुरुवार दि. ५ जुनपासून सुरू होत आहे. ही मोहीम कोल्हापूर येथील सोसायटी फॉर ॲनिमल प्रोटेक्शन या नोंदणीकृत संस्थेच्या माध्यमातून राबवली जाणार असून, वरखेडी रोडवरील ॲनिमल बर्थ कंट्रोल (ABC) सेंटरमध्ये यास प्रारंभ होणार आहे.
आमदार अनुप अग्रवाल यांनी यासाठी महापालिकेकडे वारंवार मागणी केली होती. त्यांच्या सूचनेनुसार आयुक्त अमिता दगडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही महत्त्वपूर्ण मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेच्या अंतर्गत मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांच्या निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया केली जाईल, त्यानंतर त्यांना अँटी रेबीज लसीकरण दिले जाईल. ही कुत्री तीन ते चार दिवस ABC सेंटरमध्येच संगोपनात ठेवण्यात येणार असून, त्यानंतर ती पुन्हा मूळ ठिकाणी सोडली जातील.
धुळे शहरात गेल्या काही वर्षांत मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे अनेक बालके व नागरिक जखमी झाले आहेत. काही घटनांमध्ये मृत्यूही झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. ही मोहीम भविष्यात मोकाट कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी निर्णायक ठरणार आहे. ॲनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाच्या नियमांनुसार मोकाट प्राण्यांचे निर्बीजीकरण आणि लसीकरण नोंदणीकृत संस्थांकडूनच केले जाऊ शकते. कोल्हापूर येथील ‘सोसायटी फॉर ॲनिमल प्रोटेक्शन’ ही संस्था केंद्र शासनाच्या यादीतील असून, तिची नियुक्ती नियमबद्ध पद्धतीने करण्यात आली आहे.
महापालिकेने नागरिकांना या मोहिमेस सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. उघड्या जागांवर उष्टे अन्न, हाडं-मांस टाकू नये, तसेच लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना एकटे न सोडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास शहरात मोकाट कुत्र्यांचा त्रास निश्चितच कमी होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.