धुळे जिल्ह्याला ‘ड प्लस’ दर्जा देण्याची आमदार अनुप अग्रवाल यांची मागणी – उद्योगमंत्री उदय सामंत यांना निवेदन

राज्य शासनाच्या प्रस्तावित नवीन औद्योगिक धोरणामध्ये धुळे जिल्ह्याला ‘ड प्लस’ दर्जा देण्यात यावा, अशी आग्रही मागणी धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी आज दि. १० जून रोजी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे सविस्तर निवेदनाद्वारे केली. औद्योगिकदृष्ट्या मागासलेल्या धुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ही मागणी अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

धुळे जिल्ह्याची सद्यःस्थिती मांडताना आमदार अग्रवाल म्हणाले की, “जळगाव, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या शेजारील जिल्ह्यांनी औद्योगिक क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे, मात्र धुळे जिल्हा अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिला आहे.” त्यामुळे रोजगारनिर्मिती, गुंतवणूक आणि औद्योगिक संधींमध्ये धुळे मागे पडत आहे. सध्या धुळे जिल्ह्यात अक्कलपाडा प्रकल्प, सुलवाडे-जामफळ-कनोली प्रकल्प यांसारख्या जलसिंचन योजनांमुळे पाणीपुरवठ्याची समस्या दूर झाली आहे. सात राष्ट्रीय महामार्गांचे जाळे, धुळे-नरडाणा रेल्वेमार्गाची प्रगती, तसेच दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रकल्पांतर्गत धुळ्याची निवड ही औद्योगिक विकासासाठी उपयुक्त संधी ठरू शकते.

धुळे जिल्ह्याला प्रस्तावित धोरणात ‘ड प्लस’ दर्जा द्यावा, सद्यःस्थितीत अस्तित्वात असलेल्या उद्योगांना सवलती द्याव्यात, इमर्जिंग आणि एस्पार्लेशन क्षेत्रातील गुंतवणुकीला १२० टक्के प्रोत्साहन, SGST सवलत, व्याजसूट, अशा विविध लाभांचा समावेश व्हावा, अशी विनंती आमदार अग्रवाल यांनी केली. या मागण्यांवर प्रतिसाद देताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी धुळे जिल्ह्याला ‘ड प्लस’ दर्जा देण्यासाठी शासन सकारात्मक आहे आणि या दिशेने आवश्यक ती पावले उचलली जातील, असे आश्वासन आमदार अनुप अग्रवाल यांना दिले. तसेच इतर मागण्यांवरही सकारात्मक विचार केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top