धुळे जिल्ह्यातील पोलीस दलाला आज नवे बळ मिळाले आहे. मागील वर्षी भरती करण्यात आलेल्या ५६ नव्या पोलिस अमलदारांनी आपले प्रशिक्षण पूर्ण करून आज जिल्ह्यात पोलीस सेवेत रुजू झाले. या नव्या भरतीमध्ये ३७ पुरुष तर १९ महिला पोलिसांचा समावेश आहे.
या पोलिस कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण विभाजित स्वरूपात घेण्यात आले. पुरुष अमलदारांनी लातूर येथे तर महिला अमलदारांनी नागपूर येथील प्रशिक्षण केंद्रात आपले प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. या नव्या भरतीतील शैक्षणिक पार्श्वभूमीही उल्लेखनीय आहे — ३ अभियंते, ४ बीएससी, १३ बीए, २० बीकॉम आणि उर्वरित १२वी उत्तीर्ण उमेदवारांचा यामध्ये समावेश आहे. ह्या ५६ अमलदारांपैकी ३९ नियमित, ६ माजी सैनिक, ५ खेळाडू कोट्यातून, ४ अनुकंपा तत्वावर तर २ होमगार्ड कोट्यातून निवड करण्यात आली आहे.
आज या नवोदित पोलिस अमलदारांचा जिल्हा पोलीस दलात पहिला दिवस होता. यानिमित्ताने अधिकाऱ्यांनी स्वतः वेळ काढून त्यांना भेट देत कंडक्ट, शिस्त, व्यसनमुक्त जीवनशैली व व्यक्तिमत्व विकास याबाबत मार्गदर्शन केले. नवोदित पोलिसांनी आपल्या प्रशिक्षण काळातील अनुभवही यावेळी शेअर केले.विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे प्रशिक्षण केंद्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल तीन महिला पोलिस अमलदारांना सन्मानित करण्यात आले.
नप्रमपोशि/ सानिका कृष्णात चौघुले (पोलीस मुख्यालय, धुळे) — वारली चित्रकला स्पर्धेत पुरस्कार विजेती.
नप्रमपोशि/ गायत्री संजय खैरनार (पोलीस मुख्यालय, धुळे) — वाल पेंटिंग स्पर्धेत पुरस्कार विजेती.
नप्रमपोशि/ वैष्णवी प्रेमकुमार मानिखेडकर (पोलीस मुख्यालय, धुळे) — तायक्वांदो या क्रीडा प्रकारात पुरस्कार प्राप्त.
या नव्या भरतीमुळे धुळे जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था अधिक मजबूत होण्याची अपेक्षा असून, नव्या जवानांनी समाजाप्रती आपली जबाबदारी समजून, प्रामाणिक आणि शिस्तबद्ध सेवा करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे.

