शहादा शहरात “इमानदारी अजूनही जिवंत आहे” याचे एक जिवंत उदाहरण पाहायला मिळाले. गरीब नवाज कॉलनीत राहणारे अमीन अय्युब शेख उर्फ अमु या छोट्याशा भंगार विक्रेत्याने दहा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने प्रामाणिकपणे त्यांच्या मूळ मालकाला परत करत संपूर्ण समाजासमोर एक उज्वल आदर्श निर्माण केला आहे.
दिनांक ९ जून रोजी अमीन शेख, जे रोजच्या रोज शहादा शहरातील गल्लीबोळात फिरत भंगार गोळा करतात, हे विकास हायस्कूलजवळील राजपूत सर यांच्या घरी गेले. त्यांनी त्यांच्या घरातील जुन्या पेपर आणि भंगार अमीनला दिला. हे भंगार आपल्या घरी नेऊन छाटणी करत असताना, अमीनच्या लक्षात आले की एका डब्यात सोन्याचे दागिने आहेत. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी संबंधित घराशी संपर्क साधून संपूर्ण माहिती दिली आणि स्वतः जाऊन ते दागिने परत केले. माहितीप्रमाणे, हे दागिने राजपूत सर यांच्या घरातील होते.
अमीन उर्फ अमु यांचे जीवन अत्यंत साधे आहे. भाड्याची रिक्षा घेऊन भंगार जमा करणे आणि त्या विक्रीतून मिळणाऱ्या दोन-अडीचशे रुपयांत घराचा चरितार्थ चालवणे, हेच त्यांचे दैनंदिन जीवन. त्यांच्याकडे आई, पत्नी, लहान भाऊ आणि बहिण असा छोटासा पण कुटुंबवत्सल परिवार आहे. अशा परिस्थितीतसुद्धा त्यांनी प्रलोभनांना बळी न पडता प्रामाणिकपणा जपला. आपले हरवलेले दागिने परत मिळाल्यानंतर संबंधित कुटुंबाने अमीन शेख यांच्या प्रामाणिकपणाचे भरभरून कौतुक केले. त्यांच्या प्रामाणिकपणाच्या सन्मानार्थ त्यांना चांगल्या कंपनीचा मोबाईल फोन भेट म्हणून देण्यात आला. आज शहादा शहरात आणि परिसरात अमीन अय्युब शेख उर्फ अमु यांच्या इमानदारीची चर्चा सर्वत्र होत आहे. “आजही समाजात असे लोक आहेत जे इमानदारी आणि मूल्यांची जपणूक करत आहेत – हे पाहून समाधान वाटतं,” असे मत अनेकांनी व्यक्त केले.
