पंढरपूरच्या वाटेवर निघालेल्या वारकऱ्यांची आरोग्य तपासणी; एबी फाउंडेशन आणि कान्हदेश वारकरी मंडळाचा सेवाभावी उपक्रम

धुळे शहरात आज ११ जुने रोजी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून औषध वाटप करणारा सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. आमदार अनुप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली एबी फाउंडेशन आणि कान्हदेश वारकरी सेवा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने हिंदू एकता चौक येथे हे आरोग्य शिबिर पार पडले.

आमदार अनुप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली एबी फाउंडेशन व कान्हदेश वारकरी सेवा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने हिंदू एकता चौक, गल्ली क्रमांक ५, येथे एक दिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिरामध्ये नंदुरबार जिल्हा, शिरपूर, शिंदखेडा तालुका व जळगाव जिल्ह्यातील विविध गावांतील सुमारे २०० हून अधिक महिला व पुरुष वारकऱ्यांची तपासणी करण्यात आली.

तपासणी दरम्यान हृदयविकार, ईसीजी, ताप, सर्दी-खोकला, व्हायरल इन्फेक्शन, तसेच पाय सुजणे, जखमा यांसारख्या लांब चालण्यामुळे उद्भवणाऱ्या त्रासांवर विशेष लक्ष देण्यात आले. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने सहभाग घेतला. यामध्ये डॉ. गणेश पाटील, डॉ. अनामिका सानप, डॉ. सिद्धार्थ पाटील, डॉ. सोहम मिसाळ यांनी तपासणीचे कार्य पाहिले, तर परिचारिका विणाली हजारे व वैशाली मुर्तडक यांनी उपचारात मदत केली. सर्व वारकऱ्यांना आवश्यकतेनुसार औषधोपचार करण्यात आले आणि औषधांचे कीट मोफत वितरित करण्यात आले.

या औषध किटचे वाटप एबी फाउंडेशनच्या संचालिका अल्पा अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व समन्वय कमलेश देवरे यांनी केले. या उपक्रमात कान्हदेश वारकरी सेवा मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये उपाध्यक्ष हिरामण गवळी, सुनील वाघ, कुमार मराठे, शोभाताई खैरनार, विश्वस्त धनराज देसले, पी. एन. खैरनार, विनोद पवार, प्रकाश विभांडिक, कैलास पवार, योगिराज पाटील, यशवंत पाटील, नारायण पाटील, पप्पू शिंदे, किरण भारती, कांतिलाल सोनार, किरण पाटील, किरण माळी, डॉ. देसले, संभाजी पाटील, भगवान मराठे, विजय वाघ या सर्वांच्या सहकार्याने उपक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडला.

वारकऱ्यांनी या आरोग्य शिबिरामुळे त्यांना पंढरपूरच्या वाटचालीदरम्यान आरोग्यविषयक भेडसावणाऱ्या त्रासांपासून मोठा दिलासा मिळाल्याचे सांगितले. डॉक्टरांनी केलेली तपासणी, औषधोपचार आणि औषधांचे वाटप यामुळे त्यांना मोठा आधार मिळाला. शिबिरात सहभागी झालेल्या अनेक वारकऱ्यांनी आमदार अनुप अग्रवाल, संचालिका अल्पा अग्रवाल, तसेच कान्हदेश वारकरी सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आणि भरभरून आशीर्वाद दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top