जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्यासह मान्यवरांनी केले नवप्रविष्ट विद्यार्थ्यांचे स्वागत
मुला-मुलींना शाळेत पाठवू या, सारे शिकुया, पुढे जाऊया, चला जाऊ शाळेला, नव्या गोष्टी ऐकायला, आधी रोटी खाऐगे, स्कूल जरुर जाऐगे, बच्चे मांगे प्यार दो, शिक्षा का अधिकार दो… च्या जयघोषात नवप्रविष्ट विद्यार्थ्यांचा, कुठे बैलगाडीतून तर कुठे बग्गीतून मिरवूणक काढून शाळा प्रवेशोत्सव सोहळा झाला. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते या उपस्थितीत तिखी, ता. धुळे येथे नवप्रविष्ट विद्यार्थ्यांचा शालेय प्रवेशोत्सव मोठया उत्साहात पार पडला.
या शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमास तहसिलदार अरुण शेवाळे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ.किरण कुवर, गटशिक्षणाधिकारी भारती भामरे, सरपंच कविता पाटील, विस्तार अधिकारी (शिक्षण) सतिलाल कोळी, मुख्याध्यापिका ललीता बोरसे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रावसाहेब बेलदार यांच्यासह विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सन 2025-2026 या शैक्षणिक वर्षांची सुरुवात होण्याच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना आंनददायी व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या उद्देशाने शाळा प्रवेशोत्सव हा उपक्रम साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा, तिखी, ता. जि.धुळे येथे इयत्ता पहिलीतील 24 नवप्रविष्ट विद्यार्थ्यांचा शालेय प्रवेशोत्सव सोहळा संपन्न झाला. श्रीमती विसपुते यांनी नवप्रविष्ठ विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देवून विद्यार्थ्यांचे स्वागत करुन विद्यार्थ्यांशी संवादही साधला.
जिल्हाधिकारी श्रीमती विसपुते म्हणाल्या की, आजच्या या शाळा प्रवेशोत्सव उपक्रमामुळे विद्यार्थी, शिक्षक, पालक व समाज यांचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होऊन राज्याच्या शैक्षणिक प्रगतीस मदत होईल. यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती विसपुते यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात विद्यार्थ्यांना गणवेश, एक जोडी बूट, मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे पहिले पाऊल वर्गात टाकून विद्यार्थ्यांचा प्रवेश करण्यात आला. एक पेड मॉ के नाम अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. तसेच शालेय किचनला जिल्हाधिकारी यांनी भेट दिली. प्रवेशोत्सवापुर्वी नवप्रविष्ठ विद्यार्थ्यांची गावातून शोभायात्रा काढण्यात आली.
कार्यकमाचे प्रास्ताविक शिक्षक विलास पाटील, सूत्रसंचलन दर्पण देसले तर मुख्याध्यापिका भारती भामरे यांनी आभार मानले.यावेळी प्राथमिक शिक्षक श्रीमती कल्पना चौधरी, मनिषा केदार, कृष्णाबाई पाटील, कविता खैरनार आदी उपस्थित होते.

