धुळे l प्रतिनिधी l मुंबईत मंगळवारी झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत धुळे शहरातील १६ प्रमुख विकासप्रस्तावांवर सखोल चर्चा होऊन त्वरित कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत आमदार अनुप अग्रवाल यांनी थेट शहराच्या विकासासंदर्भातील मुद्दे मांडले. या वेळी महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पावसाचे पाणी व्यवस्थापनासाठी 513 कोटींचा प्रस्ताव –
शहरातील जलनिचऱ्याच्या समस्येवर उपाय म्हणून स्टॉर्म वॉटर ड्रेनेज योजनेसाठी डीपीआर तयार करून 513 कोटींचा प्रस्ताव सादर. यावर तत्काळ तांत्रिक तपासणी करून मंजुरीचे निर्देश देण्यात आले.
228 कोटींच्या तापी पाईपलाईन नूतनीकरणास मंजुरी –
जुनी झालेली तापी जलवाहिनी वारंवार गळतीमुळे नूतनीकरणाची गरज भासली. महाराष्ट्र सुवर्णजयंती योजनेअंतर्गत सादर केलेल्या 228.05 कोटींच्या प्रस्तावास मंजुरी प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याचे आदेश.
सरळसेवा भरतीसाठी बिंदुनामावली प्रस्तावाला गती –
महापालिकेतील रिक्त 838 पदांपैकी 126 पदांसाठी भरतीला शासनाने मान्यता दिली असून, बिंदुनामावली प्रस्तावास कार्यवाहीचे निर्देश.
इतर ठळक प्रस्ताव व निर्णय –
1)714 कोटींच्या मलनिस्सारण योजनेसाठी UIDF अंतर्गत कर्ज प्रस्तावावर चर्चा.
2)18 मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्पासाठी निधी उपलब्धतेसाठी ‘महाप्रीत’कडून कार्यवाहीचे आदेश.
3)एलबीटी थकबाकीसाठी 216.78 कोटींच्या अनुदान प्रस्तावास सकारात्मक प्रतिसाद.
4)हद्दवाढीमुळे जीएसटी अनुदान दुप्पट करून 28.57 कोटी करण्याचा ठराव मंजूरीच्या प्रक्रियेत.
5)पांझरा रिव्हर फ्रंट प्रकल्पासाठी 100 कोटींचा निधी देण्याच्या सूचना.
6)सुरत बायपासवरील 19.69 हेक्टर जागेत थीम पार्कसाठी 25 कोटी निधी व जागा हस्तांतरणास सहमती.
7)सर्वे क्र. 529 च्या आरक्षणातून 5.15 हेक्टर क्षेत्र वगळून रहिवासी वापरास मंजुरी.
बैठकीत उपस्थित मान्यवर –
नगरविकास मंत्री माधुरी मिसाळ, आमदार अनुप अग्रवाल, आयुक्त अमिता दगडे-पाटील, जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, नियोजन विभागाच्या सुमिता घाडगे, कक्ष अधिकारी धनंजय भागवत, सुनीता साळुंके (वित्त), कार्यकारी अभियंते नवनीत सोनवणे, मंजिरी पवार, अजिंक्य बगाडे, इत्यादी अधिकाऱ्यांनी चर्चेत सहभाग घेतला.
आमदार अनुप अग्रवाल यांचा अभिनव पुढाकार –
महापालिकेकडून महासभेत ठराव करून विकास प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्याचे धोरणात्मक पाऊल आमदार अग्रवाल यांनी उचलले होते. मंत्री माधुरी मिसाळ यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे शहर विकासाला चालना मिळण्यास सुरुवात झाली आहे. आमदार अग्रवाल यांनी बैठकीतील सकारात्मक निर्णयांबाबत मंत्री मिसाळ यांचे आभार मानले.
