लोणखेडीचे प्रगतिशील शेतकरी रमेश पाटील यांचा कृषी दिनानिमित्त गौरव

मका उत्पादनात हेक्टरी ७५ क्विंटलचे भरघोस उत्पादन घेत दुसरा क्रमांक

धुळ्यातील लोणखेडी येथील प्रगतिशील आणि प्रयोगशील शेतकरी रमेश यादवराव पाटील यांचा नुकत्याच झालेल्या कृषी दिनाच्या कार्यक्रमात विशेष सन्मान करण्यात आला. कृषी महाविद्यालयात झालेल्या या संयुक्त कार्यक्रमात मका उत्पादनात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सीताराम चौधरी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र आणि रोख तीन हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

रमेश यादवराव पाटील यांनी २०२४-२५ या खरीप हंगामात आपल्या शेतात हेक्टरी तब्बल ७४.८० क्विंटल मका उत्पादन घेऊन धुळे तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला. हा सन्मान माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि आत्मा (ATMA) प्रकल्पाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या वेळी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप, आत्माचे प्रकल्प संचालक हितेंद्र सोनवणे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. दिनेश नांद्रे, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. देसले, व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

रमेश पाटील हे लोणखेडी परिसरातील अत्यंत कार्यक्षम आणि नवनवीन प्रयोग करणारे शेतकरी म्हणून परिचित आहेत. केवळ मका नव्हे, तर ते आपल्या शेतीत केशर आंबा, पेरू, चिकू, सीताफळ, रामफळ, लिंबू यांसारख्या फळपिकांचेही उत्कृष्ट उत्पादन घेतात. कलम पद्धतीद्वारे झाडांची वाढवणूक करण्यात त्यांना विशेष प्रावीण्य प्राप्त झाले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल लोणखेडी ग्रामस्थ, शेतकरी बांधव आणि विविध संस्थांकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top