२४ तासांत खुनाचा उलगडा ! गोपालसिंग परदेशी हत्या प्रकरणातील दोघांना थाळनेर पोलिसांकडून अटक

शिरपूर तालुक्यातील पिळोदा येथे घडलेल्या धक्कादायक हत्या प्रकरणाचा २४ तासांत उलगडा करत थाळनेर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. गोपालसिंग बाबूसिंग परदेशी (वय ६२) यांचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी आकाश इच्छे व अलोक चव्हाण यांना नाशिक ग्रामीणमधील देवळा पोलीस ठाण्याच्या सहकार्याने पोलिसांनी ताब्यात घेतले.

दि. १ जुलै रोजी रात्री १२.३० च्या सुमारास पिळोदा येथे गोपालसिंग परदेशी आपल्या राहत्या घरी झोपले असताना आरोपी आकाश पवन इच्छे व अलोक भास्कर चव्हाण यांनी घरात घुसून त्यांच्यावर धारदार चाकूने वार करत खून केला. गोपालसिंग यांच्या पुतण्याने थाळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच गुन्हा क्र. ९४/२०२५ भारतीय दंड संहिता कलम १०३(१), ३३३ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. थाळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि शत्रुघ्न पाटील यांच्या नेतृत्वाखाली शोधमोहीम राबवण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे आरोपी धुळे व मालेगाव मार्गे पळून जात असल्याचा संशय होता. नाशिक ग्रामीणच्या देवळा परिसरात दोन संशयित इसम फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार देवळा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोनि सार्थक नेहते यांनी त्या दोघांना ताब्यात घेतले.

आरोपींनी चौकशीत गोपालसिंग परदेशी यांच्यावर चोरीसाठी हल्ला केल्याचे कबूल केले. आकाश इच्छे याला वडिलांच्या कॅन्सर उपचारासाठी तर अलोक चव्हाण याला घराच्या बांधकामासाठी पैशांची गरज होती. परदेशी हे घरात एकटे असल्याची माहिती मिळताच त्यांनी चोरीचे ठरवले. मात्र, गोपालसिंग यांना जाग आल्याने त्यांनी प्रतिकार केला. त्यावेळी आकाशने त्यांच्या गळ्यावर वार करत त्यांचा खून केला. ही गंभीर घटना केवळ २४ तासांच्या आत उकलण्यात आलेली असून हि कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली थाळनेर पोलिस स्टेशनचे प्रभारी सपोनि. शत्रुघ्न पाटील, सई समाधान भाटेवाल, दिलीप पवार, हेकॉ संजय धनगर, विजय ठाकुर, रुपेश गांगुर्डे, राजेंद्र भिल, कॉ उमाकांत वाघ, किरण सोनवणे, धनराज मालचे, मुकेश पवार, रविंद्र मोरे, आकाश साळुंखे, मनोज कोळी यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top