छ. संभाजी महाराज स्मारकास अडथळा ठरणारे सुशोभीकरण त्वरित थांबवावे – स्मारक समितीची धुळे मनपाकडे मागणी

धुळे शहरात उभारण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३० फूट उंचीच्या पहिल्या भव्य स्मारकास अडथळा निर्माण करणाऱ्या वीर सावरकर पुतळ्याजवळील सुशोभीकरणाच्या कामावर तात्काळ बंदी घालावी, अशी मागणी स्मारक समितीने धुळे महापालिकेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ह्या निवेदनात सांगण्यात आले आहे की, धुळे शहर व खानदेशातील शिवभक्तांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक हे शहरात उभारण्यात आलेले पहिले भव्य स्मारक आहे. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर हे स्मारक साकारण्यात आले असून ते एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अभिमानाचे प्रतिक आहे. परंतु काही महिन्यांपूर्वी वीर सावरकर यांच्या पुतळ्याजवळ सुशोभीकरणाचे काम सुरू करण्यात आले. त्यावेळी स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन आपली नाराजी व सूचना मांडल्या होत्या, त्यामुळे काम काही काळ थांबवण्यात आले होते. मात्र, अलीकडेच पुन्हा सुशोभीकरणाचे काम सुरू झाले असून, त्याचा थेट परिणाम छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या दृश्यतेवर होत असल्याचे समितीने नमूद केले आहे.

समितीच्या म्हणण्यानुसार, सदर सुशोभीकरणामुळे स्मारकाचा ५०% पेक्षा अधिक भाग झाकला जात आहे, जे केवळ अपमानास्पद नव्हे तर इतिहास व संस्कृतीच्या अपमानासारखे आहे. “हे स्मारक बारा वर्षांच्या संघर्षातून साकारले गेले आहे. अशा स्मारकावर अडथळा निर्माण होणे हे शिवप्रेमींसाठी वेदनादायी आहे,” असे समितीने निवेदनात म्हटले आहे. स्मारक समितीने यामध्ये महानगरपालिकेतील काही अधिकारी, ठेकेदार, आर्किटेक्ट व काही राजकीय मंडळींचा निषेध व्यक्त करत असा आरोप केला की, छत्रपती संभाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास झाकण्यासाठी योजनाबद्ध पद्धतीने हे सुशोभीकरण केले जात आहे.

स्मारक समितीने प्रशासनास तत्काळ वीर सावरकर पुतळ्याजवळ सुरू असलेले सुशोभीकरण थांबवण्याची विनंती केली आहे. अन्यथा, स्मारक समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि त्याची पूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top