धुळ्याच्या बारा पत्थर चौकात बुलेटच्या कर्कश सायलेन्सरवर फिरले रोड रोलर!

धुळे शहरात बुलेटच्या कर्कश आवाजाने त्रस्त झालेल्या नागरिकांना वाहतूक पोलिसांनी मोठा दिलासा दिला आहे. वाढत्या तक्रारींची दखल घेत, धुळे शहर वाहतूक विभागाने धडक कारवाई करत बुलेटचे कानठळ्या बसवणारे सायलेन्सर, प्रेशर हॉर्न आणि फॅन्सी नंबर प्लेट्सवर रोड रोलर फिरवून ते नष्ट केले. बारा पत्तर चौकात झालेल्या या कारवाईत ५६ सायलेन्सर, २० हून अधिक प्रेशर हॉर्न आणि ५० हून जास्त फॅन्सी नंबर प्लेट्स नागरिकांच्या उपस्थितीत चिरडून टाकण्यात आले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांनी पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत केले. परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख आणि वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. गेल्या चार-पाच दिवसांत वाहतूक विभागाने १६१२ कारवाया करत सुमारे ९ लाख ९२ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. या कारवाईमुळे शहरात वाहतूक शिस्त सुधारण्यास मदत होणार असून बेकायदेशीर वाहनचालकांवर वचक निर्माण होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top