धुळे : जिल्ह्यात अटक करण्यात आलेल्या चार बांगलादेशी नागरिकांना आज दिनांक १६ जुलै रोजी न्यायालयाने ९ महिन्यांची सश्रम कारावास आणि प्रत्येकी ६००० रुपयांचा दंड ठोठावला आहे. ही कारवाई विशेष महत्त्वाची मानली जात असून, परराज्यातून बेकायदेशीररीत्या भारतात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींवर धुळे पोलिसांनी घेतलेली ठोस भूमिका यामधून स्पष्ट होते.
दोषी आरोपींची नावे पुढीलप्रमाणे –
- मोहम्मद महताब बिलाल शेख
- शिल्पी बेगम कबीर मुंशी
- ब्यूटी बेगम मातुब्बर
- रिपा माकोल मातुबर
या सर्व आरोपींना तपास अधिकारी पीआय श्रीराम पवार (स्थानिक गुन्हे शाखा, धुळे) यांच्या नेतृत्वाखाली अटक करण्यात आली होती. प्रकरणाचा तपास बारकाईने करून न्यायालयात ठोस पुरावे सादर करण्यात आले.
या प्रकरणाची सुनावणी मुख्य न्यायमूर्ती आर. एस. अडकिने यांच्या न्यायालयात पार पडली. आरोपींनी बेकायदेशीररीत्या भारतात प्रवेश केल्याचे सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाने त्यांना ९ महिन्यांची सश्रम कैद आणि प्रत्येकी ६००० रुपयांचा दंड सुनावला.

