बनावट सिलिंग पट्ट्या व बॉटम पट्ट्यांचे उत्पादन करून अधिकृत डिझाईन्सची प्रत केलेल्या कारखान्यावर धुळे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी छापा टाकून सुमारे ₹3,77,340 किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, कारखान्याचे मालक मुख्तार खान शहजाद खान यांच्यावर कॉपीराईट कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे येथील फिर्यादी सर्फराज अब्दुल रऊफ तांबोळी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मुंबईस्थित सेंट गोबीन इंडिया प्रा. लि. या कंपनीने विकसित केलेल्या अधिकृत डिझाईन व पॅटर्नचा वापर करून स्मार्ट स्टील या धुळेतील प्लॉट नं. २९, १०० फुटी रोडवरील कारखान्यात बनावट उत्पादन केले जात होते. यामुळे कंपनीची आर्थिक फसवणूक होत असल्याचा आरोप करण्यात आला होता.
पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार, छापा टाकताना धुळे-मुंबई आग्रा महामार्गावरील गोल्डन पार्कजवळील गोडावूनमध्येही कारवाई करण्यात आली.06 लोखंडी डाईज, 600 नग एल पट्ट्या , 150 नग सिलिंग पट्ट्या , 12 स्टील बॉटम पट्ट्या , 20 पॅरामिटर पट्ट्या , 02 उत्पादन यंत्रणा असा एकुण ३,७७,३४०/- रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आलाय .. या प्रकरणात चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुरेशकुमार घुसर व त्यांच्या पथकाने केली. या टिममध्ये पोउनि हरीशचंद्र पाटील, पोहेकॉ. अविनाश वाघ, रमाकांत पवार, शोएब बेग, अतीक शेख, सचिन पाटील आदींचा समावेश होता.

