धुळे (प्रतिनिधी) – धुळे जिल्ह्यात खळबळ उडवणाऱ्या आणि मानवी संवेदनांना हादरवणाऱ्या पुजा बागुल खून प्रकरणातील मुख्य आरोपीच्या साथीदार प्रज्ञा महेश कार्डिले हिचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. आरोपी महिलेने आपल्यावरील आरोप फोल ठरवत निर्दोष असल्याचा दावा केला होता, मात्र न्यायालयाने तो युक्तिवाद अमान्य ठरवला.
भारतीय सैन्यात कार्यरत असलेल्या सैनिकाची पत्नी पुजा बागुल यांचा निर्घृण खून करण्यात आला होता. त्यांच्या वैवाहिक जीवनात तिसऱ्या व्यक्तीचा – म्हणजेच प्रज्ञा कार्डिले – प्रवेश झाल्यानंतर अवैध संबंधांत अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून हा खून झाल्याचा आरोप आहे. खून केल्यानंतर पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे.
या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात पुजाच्या पतीसह एकूण दहा आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणातील आरोपी क्र. २ आणि ३ – म्हणजेच मयत पुजाच्या सासू-सासऱ्यांचा जामीन अर्जही याआधी न्यायालयाने फेटाळला आहे.
आता आरोपी क्र. ५ – प्रज्ञा महेश कार्डिले हिने जिल्हा व सत्र न्यायालयात नियमित जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. तिने कौटुंबिक जबाबदाऱ्या, लहान मुले आणि खुनाशी असलेल्या गैरसंबंधाचा इन्कार करत जामीन मिळावा, अशी मागणी केली होती. मात्र सरकारी पक्षाच्यावतीने अॅड. एन.बी. कलाल आणि फिर्यादी पक्षाच्यावतीने अॅड. अमित दुसाणे यांनी आरोपीविरोधात ठाम युक्तिवाद मांडला.
अॅड. दुसाणे यांनी न्यायालयाला सांगितले की, आरोपी महिलेचे मृतक पुजा बागुलच्या पतीशी अनैतिक संबंध होते. तिनेच पतीला पुजाला सोडून देण्यासाठी चिथावणी दिली आणि खुनाच्या दिवशी इंजेक्शन देऊन पुजाला अर्धमुर्तावस्थेत सोडून तिच्यावर क्रुरतेने बघ्याची भूमिका घेतली. यामुळे आरोपीवर गंभीर आरोप सिद्ध होत असून, तिला जामीन दिल्यास पुरावे नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सर्व युक्तिवाद आणि पुरावे लक्षात घेत न्यायाधीश यास्मिन देशमुख यांनी आरोपी प्रज्ञा कार्डिलेचा जामीन अर्ज फेटाळला. या निर्णयामुळे आरोपींना कारागृहातच मुक्काम वाढवावा लागणार आहे.
या प्रकरणात न्यायप्रक्रिया सुरू असली तरी समाजमनावर खोल परिणाम करणाऱ्या या घटनेबाबत न्यायालयाच्या पुढील निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रतिनिधी कार्तिक सोनवणे

