धुळे तालुक्यातील कापडणे गावात शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून ग्रामस्थांचा संताप उफाळून आला असून, ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाला कंटाळून ग्रामस्थांनी थेट गावातील पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले’ स्टाईल आंदोलन छेडलं. या आंदोलनामुळे प्रशासन आणि ग्रामपंचायतचे धाबे दणाणले असून, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवकांनी घटनास्थळी धाव घेतली.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गेल्या अनेक महिन्यांपासून ग्रामपंचायतीमार्फत शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नसल्याबाबत वेळोवेळी तक्रारी करण्यात आल्या. मात्र, कोणतीही कार्यवाही न झाल्याने अखेर सामाजिक कार्यकर्ते भूषण ब्राम्हणे आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी आक्रोश व्यक्त करत आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.
या आंदोलनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ ग्रामस्थ एकत्र जमले होते. “पाणी आमचं हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं” आणि “कापडणेकर जनतेला शुद्ध पाणी मिळालंच पाहिजे” अशा घोषणा देत ग्रामस्थांनी थेट गावाच्या मुख्य पाणी टाकीवर चढून अनोख्या पद्धतीने आंदोलन केलं.
यावेळी ग्रामस्थांनी साडेआठ कोटींच्या पाइपलाइन प्रकल्पाच्या संदर्भात कोणताही ठराव किंवा पूर्णत्वाचा दाखला ठेकेदारांना देऊ नये, अशी स्पष्ट मागणी केली. तसेच, गावातील मराठी शाळेत नाकारणीत पडलेल्या १७ लाखांच्या पाणी फिल्टर प्लांटला तातडीने कार्यान्वित करण्याचीही मागणी करण्यात आली.
या आंदोलनाची दखल घेत ग्रामपंचायत प्रशासनाने आश्वासन दिले असले तरी ग्रामस्थांचा संताप शमलेला नाही. प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास पुढे अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
प्रतिनिधी कार्तिक सोनवणे

