स्वच्छता कामगारांचे आरोग्य धोक्यात; सुरक्षा किट कुठे?

उबाठा युवासेनेचे पंकज गोरे यांची महापालिकेला सुरक्षा कीट देण्याची मागणी

धुळे शहराच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या स्वच्छता कामगारांचे आरोग्य धोक्यात आले असून, त्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेली उपकरणं महापालिकेकडून अद्यापही पुरवली गेलेली नाहीत. या पार्श्वभूमीवर युवासेनेचे राज्यसहसचिव अॅड. पंकज गोरे यांनी महापालिकेकडे तात्काळ सुरक्षेच्या कीट्स देण्याची मागणी केली आहे.

पावसाळ्याच्या दिवसांत शहरातील अनेक भागांत पाणी साचते, गटारी आणि नाले भरून वाहतात. या गटारांची आणि नाल्यांची साफसफाई ही स्वच्छता कामगार करत असतात. हे काम करताना त्यांना विषाणू, घाण, दूषित पाणी आणि इतर अनेक जीवघेण्या धोक्यांचा सामना करावा लागतो. अशा वेळी महापालिकेने त्यांना आवश्यक सुरक्षा किट्स – जसे की ग्लोव्हज, मास्क, बूट, रेनकोट इत्यादी – देणे अत्यावश्यक आहे.

मात्र प्रत्यक्षात हे किट्स न मिळाल्याने अनेक कामगार आजारी पडत आहेत. याबाबत युवासेनेच्या वतीने अॅड. पंकज गोरे यांनी मनपा अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे यांना निवेदन देऊन तातडीने योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली. “शहराच्या स्वच्छतेसाठी जीव धोक्यात घालणाऱ्या कामगारांच्या आरोग्याची जबाबदारी महापालिकेची आहे. तरी प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी,” अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top