धुळे शहरातील पेठ भागात सध्या साथीच्या आजारांनी थैमान घातले असून, दुषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांना आजारांची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे, ज्यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
या भागात सध्या दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे, मात्र अनेक ठिकाणी येणारे पाणी दुषित आणि दुर्गंधीयुक्त असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबांत सर्दी, ताप, उलट्या, पातळ पाणी यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख कैलास मराठे यांनी महापालिका प्रशासनावर सडकून टीका केली. “वेळोवेळी पाण्याची गुणवत्ता तपासण्याची मागणी करूनही महापालिकेने दुर्लक्ष केले आहे, परिणामी सामान्य नागरिक आजारी पडत आहेत,” असा आरोप त्यांनी केला.
“मनपा प्रशासनाने ही परिस्थिती गांभीर्याने घ्यावी आणि तातडीने दुषित पाणीपुरवठा थांबवून तपासणी करून योग्य उपाययोजना करावी,” अशी मागणी ठाकरे गटाच्या शिवसेनेने यावेळी केली. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न डोळ्यासमोर ठेवून तातडीने कारवाई न झाल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे.

