राज्यातील कांदा उत्पादन, बाजारभाव, निर्यात धोरण आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेणाऱ्या राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अंतर्गत कांदा धोरण समितीची स्थापना करण्यात आली असून, या समितीवर नेर (ता. धुळे) येथील कांदा तज्ज्ञ, निर्यातदार व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव खलाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीसाठी राज्याचे पणन आणि राजशिष्टाचार मंत्री तसेच धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी शिफारस केली होती. त्यांच्या शिफारशीवर राज्य शासनाने खलाणे यांची निवड मान्य केली. कांदा हे महाराष्ट्रातील एक अत्यंत संवेदनशील व अर्थकारणावर परिणाम करणारे महत्त्वाचे पीक असून, दरवर्षी बाजारभावातील चढ-उतारामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ताण निर्माण होत असतो. यावर उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांना योग्य दर, निर्यात धोरण, अनुदान आणि नाफेड-एनसीसीएफच्या माध्यमातून खरेदीविषयी निर्णय घेण्यासाठी ही समिती कार्यरत असेल.
या समितीच्या अध्यक्षस्थानी कृषी अभ्यासक व शेतकरी नेते पाशा पटेल आहेत. यामध्ये कृषी, पणन, सहकार, विद्यापीठांचे अधिकारी व विविध क्षेत्रातील १९ तज्ज्ञांचा समावेश आहे. शंकरराव खलाणे हे राज्य व केंद्र सरकारला कांदा पिकाबाबतची बाजारस्थिती, भाव आणि लागवड याविषयीचा आवश्यक अहवाल देण्यासाठी समितीत सक्रिय भूमिका पार पाडणार आहेत. या नियुक्तीमुळे विविध स्तरांतील मान्यवरांनी खलाणे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, माजी मंत्री अमरीशभाई पटेल, आमदार राम भदाणे, अनुप अग्रवाल, काशिनाथ पावरा, मंजुळा गावित, भाजपा जिल्हाध्यक्ष बापूसाहेब खलाणे, सुभाष देवरे, तुषार रंधे, विरेंद्रसिंग गिरासे, पंकज कदम, प्रा. अरविंद जाधव, हर्षवर्धन दहिते, संग्राम पाटील, आशुतोष पाटील, मनोहर भदाणे, बाळासाहेब भदाणे, रावसाहेब गिरासे, भाऊसाहेब देसले, चंद्रदीप पाटील, किशोर संघवी, देवेंद्र पाटील, अशोक सुडके यांच्यासह अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले.
प्रतिनिधी तुषार देवरे, देऊर
