कापडणेकरांचे थाळीनाद आंदोलन; शुद्ध पाण्यासाठी ग्रामपंचायतीला इशारा

कापडणे गावाला शुद्ध पाणी मिळावे, या मागणीसाठी आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात ग्रामस्थांनी थाळीनाद आंदोलन करत ग्रामपंचायत व प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पाणीटंचाईच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी हा लोकशाही मार्ग अवलंबण्यात आला.

सामाजिक कार्यकर्ते भूषण ब्राह्मणे यांनी पंधरा दिवसांपूर्वी पाणीप्रश्नी तक्रार अर्ज दिला होता. त्यानंतर गावकऱ्यांनी जलकुंभावर चढून आंदोलन केलं, दोन ग्रामसभा झाल्या; मात्र शुद्ध पाण्याबाबत कोणताही ठोस निर्णय ग्रामपंचायतीकडून घेण्यात आला नाही.

ग्रामपंचायतीने 17 लाख रुपयांचा आरो फिल्टर प्लॅन लवकरच कार्यरत करण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र आजतागायत तो सुरू झालेला नाही. साहित्याची अवस्था खराब असून काही साहित्य गहाळ असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली.

जलजीवन मिशनच्या अधिकाऱ्यांनी ग्रामसभेत सांगितले की, देवभाणे धरणातून पाणी मिळत नसल्याने सोनगीर येथून पाणी आणण्याचा प्रस्ताव तयार आहे. मात्र, त्याचा खर्च प्रति कुटुंब 3500 रुपये येणार असल्यामुळे ग्रामस्थांनी त्यास विरोध केला. देवभाणे धरणातून पाणी आणल्यास फक्त 900 रुपये खर्च येईल, म्हणजेच एका कुटुंबाचे सुमारे 2600 रुपये वाचतील, असा मुद्दा आंदोलकांनी मांडला.

थाळीनाद आंदोलनाद्वारे ग्रामस्थांनी इशारा दिला की, जर लवकरात लवकर शुद्ध पाणी पुरवठा सुरू झाला नाही, तर पुढील आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. यावेळी भूषण ब्राह्मणे, आत्माराम पाटील, ललित बोरसे, जितेंद्र पाटील यांच्यासह गावातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिनिधी कार्तिक सोनवणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top