धुळे जिल्ह्यातील नवविवाहित दाम्पत्याचा हृदयद्रावक अंत; चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीत उडी घेऊन आत्महत्या

अवघ्या तीन महिन्यांपूर्वी विवाहबद्ध झालेल्या नवविवाहित दाम्पत्याने किरकोळ वादातून थेट आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला. चिपळूण येथील गांधारेश्वर पुलावरून दोघांनी वाशिष्ठी नदीत उडी घेतल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी सकाळी घडली. या घटनेमुळे संपूर्ण चिपळूण हादरून गेला आहे, तर मूळचे धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील असलेल्या या तरुण दाम्पत्याच्या मृत्यूने त्यांच्या गावीही शोककळा पसरली आहे.

नाव – नीलेश रामदास अहिरे (२६) व पत्नी अश्विनी नीलेश अहिरे (१९)
सध्या राहणार – पागनाका, चिपळूण | मूळ गाव – साक्री, जि. धुळे

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी १०.३० च्या सुमारास दोघे मोटारसायकलवरून गांधारेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शनानंतर चिपळूण रेल्वे स्थानकाच्या दिशेने जात असताना दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की, माघारी फिरून दोघे गांधारेश्वर पुलावर आले.

पत्नी अश्विनीने अचानक उडी घेतली; पती नीलेशनेही पाठोपाठ उडी मारली
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, रागाच्या भरात अश्विनीने कोणताही विचार न करता नदीत उडी घेतली. हे पाहून नीलेशनेही काही क्षणातच तिच्या पाठोपाठ उडी घेतली. आजूबाजूच्या नागरिकांनी ही धक्कादायक घटना पाहून घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत दोघेही पाण्यात बुडाले होते.

एनडीआरएफकडून शोधमोहीम सुरू
घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलीस दाखल झाले. तत्काळ एनडीआरएफचे पथक पाचारण करण्यात आले असून, वाशिष्ठी नदीपात्रात सायंकाळपर्यंत शोधकार्य सुरू होते. मात्र, उशिरापर्यंत दोघांचे मृतदेह सापडले नव्हते.

फक्त तीन महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न
मे महिन्यात दोघांचा विवाह पार पडला होता. धुळे जिल्ह्यातील साक्री येथील रहिवासी असलेल्या या दाम्पत्याच्या अशा दुर्दैवी अंतामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top