मंजूर कामांचे श्रेय घेऊ नका; आमदारांनी नवा निधी आणावा – अक्कलपाडा संघर्ष समितीचा टोला

धुळे – धुळे तालुक्यातील कनोलीमध्यम प्रकल्प, पुरमेपाडा लघु प्रकल्प, कुळथे व मांडळ लघु प्रकल्प तसेच सय्यदनगर फड बंधारा यांसारख्या सिंचन योजनांच्या दुरुस्ती व कालव्यांच्या नुतनीकरणासाठी प्रशासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळवण्यात माजी आमदार कुणाल बाबा पाटील यांचा सक्रिय पाठपुरावा होता, असा दावा अक्कलपाडा संघर्ष समितीने केला आहे.

या संदर्भात श्री. पाटील यांनी सप्टेंबर 2023 मध्ये जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांची भेट घेऊन सविस्तर पत्र दिले होते. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी अंदाजपत्रक सादर करण्याचे आदेश दिले. पुढे 5 फेब्रुवारी 2024 रोजी तापी पाटबंधारे विकास महामंडळाने जलसंपदा विभागाकडे प्रस्ताव पाठवला होता. अखेर माजी उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्यानंतर 12 ऑगस्ट 2024 रोजी या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

यासंदर्भात मंत्रालयाच्या आदेशातही श्री. कुणाल पाटील यांच्या मागणीचा स्पष्ट उल्लेख आहे. यानंतर काही कामांच्या निविदाही प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या.

दरम्यान, धुळे ग्रामीणचे विद्यमान आमदार राम भदाणे हे नोव्हेंबर 2024 मध्ये निवडून आले असून, त्यांच्या आमदारकीपूर्वीच ही कामे मंजूर झाली होती. तरीही, 29 जुलै 2024 रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्तपत्रांमधून त्यांनी या कामांचे श्रेय घेतल्याचे दिसते. हे वाचून आश्चर्य व्यक्त करत अक्कलपाडा संघर्ष समितीचे श्री. लक्ष्मीकांत बोढरे आणि श्री. जगदीश नेरकर यांनी एक पत्रक प्रसिद्ध केले आहे.“पूर्वीच्या मंजूर कामांचे श्रेय घेण्याऐवजी आमदारांनी तालुक्यासाठी नवा निधी आणावा. त्या कामांचे स्वागत सर्वसामान्य जनतेसह आम्हीही करू.” असे त्यांनी या पत्रकात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top