मुंबई: 2008 मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएच्या विशेष न्यायालयाने सर्व सात आरोपींना निर्दोष मुक्त केल्याचा मोठा निकाल दिला आहे. या प्रकरणात स्फोट घडवल्याचे कोणतेही ठोस पुरावे आढळले नसल्याचे निरीक्षण नोंदवत कोर्टाने निकाल दिला.
या खटल्यात भाजपच्या माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर, ले. कर्नल श्रीकांत पुरोहित, रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, आणि सुधाकर चतुर्वेदी यांचा समावेश होता. न्यायालयीन निर्णयानंतर सर्वजण भावूक झाले. विशेषतः प्रज्ञा ठाकूर यांना अश्रू अनावर झाले.
निर्दोष मुक्ततेनंतर प्रतिक्रिया देताना प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या, “न्यायव्यवस्थेवर असलेल्या विश्वासामुळे मी तग धरला. माझा 13 दिवस छळ झाला, माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करण्यात आलं. 17 वर्षे अपमान सहन केला. माझ्याच देशात मला दहशतवादी ठरवण्यात आलं.”
दरम्यान, या निकालावर भाजपने काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “हा निकाल काँग्रेसच्या विकृत राजकारणाला चपराक आहे. ‘हिंदू समाज दहशतवादी’ असा अपप्रचार करण्याचे कारस्थान या निकालाने उधळून लावले आहे.”
ते पुढे म्हणाले, “तत्कालीन गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी ‘हिंदू दहशतवाद’ हा शब्द प्रथम वापरला. शरद पवार आणि चिदंबरम यांनीही हीच भूमिका सातत्याने मांडली. मात्र, यामागे मतांसाठी हिंदू समाजाला लक्ष्य करण्याचा डाव होता, हे आज न्यायालयीन निर्णयाने उघड झाले आहे.”

