धुळे एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी निधी मिळणार? – आमदार अनुप अग्रवाल यांची मागणी, उद्योगमंत्र्यांची तात्काळ हालचाल

औद्योगिक वसाहतीतील दुरवस्थेची दखल; प्रस्ताव तत्काळ पाठवण्याचे निर्देश, उद्योजकांमध्ये समाधानाची भावना

धुळे शहरातील अवधान येथील औद्योगिक वसाहतीत (एमआयडीसी) अंतर्गत रस्त्यांची झालेली दुरवस्था लक्षात घेता आमदार अनुप अग्रवाल यांनी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन निधीच्या मागणीसाठी निवेदन दिले. त्यावर तात्काळ प्रतिक्रिया देताना उद्योगमंत्र्यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांकडून रस्त्यांच्या कामाचा प्रस्ताव मागवण्याचे निर्देश दिले आहेत.

धुळे हा राज्यातील अविकसित जिल्हा मानला जातो. विशेषतः औद्योगिक क्षेत्रात जिल्हा अजूनही पिछाडीवर असून, अवधान एमआयडीसीमधील अंतर्गत रस्त्यांमुळे उद्योजक, व्यापारी व कामगारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाहनांची वाहतूक, कच्चा व तयार माल हलवताना अनेक अडथळे निर्माण होत आहेत.

दरवर्षी तात्पुरती डागडुजी केवळ ‘तोंडदेखलं’ उपाय ठरत असून, काही दिवसांतच रस्त्यांची अवस्था जैसे थे होते. त्यामुळे रस्त्यांचे कायमस्वरूपी मजबुतीकरण व डांबरीकरण आवश्यक असल्याचे आमदार अग्रवाल यांनी निवेदनात नमूद केले.

यावर उद्योगमंत्री सामंत यांनी धुळे एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता एस. एस. गांधिले व उपकार्यकारी अभियंता स्वप्नील पाटील यांच्याकडून तत्काळ प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आमदार अग्रवाल यांनी अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवण्याचे निर्देश दिले.

लवकरच निधी मंजूर होऊन काम सुरू होण्याची शक्यता असून, स्थानिक उद्योजक व व्यापाऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. या कामांमुळे एमआयडीसीतील पायाभूत सुविधा सुधारून उद्योग क्षेत्राला गती मिळेल, अशी अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top