धुळे शहरातील समाजविघातक व धोकादायक गुन्हेगार वैभव ऊर्फ रोहित ऊर्फ बेंडया नारायण वाघमोडे (वय २२, रा. वाल्मीकी आंबेडकर वसाहत, दंडेवाले बाबा नगर, मोहाडी उपनगर) याच्यावर MPDA कायद्यान्वये कारवाई करत नाशिक मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.
पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी आगामी सण, उत्सव व निवडणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी समाजात भीती निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तींवर MPDA अंतर्गत कडक कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार मोहाडीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या गुन्हेगारावर प्रस्ताव तयार करण्यात आला होता.
गुन्हेगारीचा धडकी भरवणारा इतिहास
बेंडया वाघमोडे याच्यावर गेल्या पाच वर्षांत खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरीचोरी, विनयभंग, पुरावा नष्ट करणे, मारहाण, शांतता भंग, बेकायदेशीर जमाव, धमकी व चिथावणी यांसारख्या गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
धुळे शहरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या बेंडया याच्या गुन्हेगारी सवयींमुळे तो धोकादायक गुन्हेगार ठरवण्यात आला आहे.
कायदेशीर प्रक्रिया व MPDA अंतर्गत कारवाई
या कारवाईसाठी पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी प्रस्ताव तयार करून उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला होता. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी सर्व कायदेशीर तरतुदींची तपासणी करून अंतिम मंजुरीसाठी सादर केला.
धुळे जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिल्यानंतर बेंडया वाघमोडे याला MPDA कायद्यानुसार नाशिक कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले.
पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय अधिकारी राजकुमार उपासे, पोनि. श्रीराम पवार, पोनि. शिल्पा पाटील, पोउनि. मोहन पाटील, पोउनि. चेतन मुंडे, तसेच पोलीस अंमलदार संतोष हिरे, कबीर शेख, हर्षल चौधरी आणि रमेश शिंदे यांच्या प्रयत्नांतून यशस्वीरीत्या पार पडली आहे.
प्रतिनिधी कार्तिक सोनवणे

