महसूल विभागाच्या ‘महसूल सप्ताह 2025’ अंतर्गत धुळे तालुक्यात ‘महसूल दूत’ उपक्रम हाती घेण्यात आला. नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू झाला असून, 150 महाविद्यालयीन युवक-युवतींना महसूल दूत म्हणून नेमण्यात आले आहे. यांना ओळखपत्रे देऊन विशेष प्रशिक्षणही देण्यात आले.
या उपक्रमाचा उद्देश महसूल विभागाच्या विविध योजनांची माहिती तरुणांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांच्या माध्यमातून जनजागृती करणे हा आहे. हे महसूल दूत पीक पाहणीसाठी डिजिटल क्रॉप सर्वे, 7/12 फेरफारसाठी ई-हक्क प्रणाली, तसेच शैक्षणिक व नोकरीसाठी लागणाऱ्या प्रमाणपत्र व दस्तऐवजांसंबंधी माहिती लोकांपर्यंत पोहचवतील. तहसील कार्यालयात झालेल्या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी रोहन कुवर यांच्या हस्ते झाले. यावेळी तहसील कार्यालयातील अधिकारी व महसूल कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिरात तलाठी राकेश भोई यांनी प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले. मंडळ अधिकारी स्वप्निल शिंदे आणि राकेश भोई यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत अनेक शंका विचारल्या, त्याचे निरसनही करण्यात आले. धुळे तालुक्यातील 60 हून अधिक महाविद्यालये व शाळांमधून या उपक्रमासाठी भरभरून सहभाग मिळाल्याने उपक्रम यशस्वी ठरला आहे.
