धुळे जिल्ह्यात ‘वीर परिवार सहायता योजना’ अंतर्गत विधी सेवा चिकित्सालयाचे उद्घाटन

सैनिक कुटुंबीयांना मोफत कायदेशीर मदतीसाठी नव्या उपक्रमाची सुरुवात

धुळे : देशाच्या संरक्षणासाठी आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या कार्यरत व सेवानिवृत्त सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोफत कायदेशीर मदत मिळावी, यासाठी ‘वीर परिवार सहायता योजना’ अंतर्गत धुळे जिल्हा सैनिक कार्यालयात ‘विधी सेवा चिकित्सालया’चे उद्घाटन करण्यात आले.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (NALSA) च्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश प्रवीण कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी जिल्हा सैनिक अधिकारी मेजर निलेश पाटील, सेवानिवृत्त कर्नल उत्तमराव पाटील, ग्रुप कॅप्टन अविनाश देवरे (BSF) यांच्यासह अनेक माजी सैनिक उपस्थित होते.

न्यायाधीश प्रवीण कुलकर्णी यांनी सांगितले की, हे चिकित्सालय आठवड्यातून दोन दिवस मोफत सेवा देईल. यातून सैनिकांना कौटुंबिक व जमिनीचे वाद, पेन्शनसंबंधी तक्रारी आणि इतर कायदेशीर बाबींवर सल्ला आणि न्यायालयीन मदत मिळणार आहे.

सेवानिवृत्त कर्नल उत्तमराव पाटील यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चा दाखला देत सैनिकांच्या कायदेशीर जागरूकतेवर भर दिला. त्यांनी सांगितले की, आर्मी कायदे माहीत असले तरी भारतीय राज्यघटनेच्या तरतुदींची माहिती अनेक सैनिकांना नसते. त्यामुळे असे चिकित्सालय गरजेचे आहे.

मेजर निलेश पाटील यांनी देखील या चिकित्सालयाचे महत्त्व अधोरेखित केले. उपक्रमामुळे सैनिक, वीरमाता, वीर पत्नी व वीरपिता यांना त्यांच्या कायदेशीर अडचणी सोडवण्यास त्वरित आणि मोफत मदत मिळणार आहे.

या उपक्रमाचे उपस्थित माजी सैनिकांनी स्वागत केले असून, त्यांच्या न्यायहक्कांसाठीचा हा उपक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top