शिरपूरमध्ये महसूल सप्ताहानिमित्त डीबीटी अडथळ्यावर उपाययोजना

लाभार्थ्यांच्या घरपोच भेटीद्वारे आधार पडताळणी मोहीम

महसूल सप्ताहानिमित्त शिरपूर तहसील कार्यालयाच्या वतीने विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी (Direct Benefit Transfer) न झालेल्या लाभार्थ्यांसाठी घरभेट उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत लाभार्थ्यांच्या घरी जाऊन आधार कार्ड आणि बँक पासबुकच्या छायांकित प्रती जमा करण्यात आल्या.

शिरपूर तहसील हद्दीतील संजय गांधी निराधार व श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेचे १,४१७ लाभार्थी आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ/विधवा/दिव्यांग योजनेचे ५,५४७ लाभार्थी असे एकूण ६,९६४ लाभार्थींची आधार पडताळणी अद्याप पूर्ण झालेली नाही. यामुळे या लाभार्थ्यांना शासकीय अनुदान थेट त्यांच्या खात्यात जमा होत नाही.

या पार्श्वभूमीवर शिरपूर तहसीलदार महेंद्र माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ग्राम महसूल अधिकाऱ्यांना डीबीटी नाकारलेल्या लाभार्थ्यांची यादी देण्यात आली. अधिकाऱ्यांनी त्या-त्या गावांतील लाभार्थ्यांच्या घरी जाऊन आवश्यक कागदपत्रे गोळा केली.

तहसीलदार महेंद्र माळी यांनी यावेळी सांगितले की, “लाभार्थ्यांनी लवकरात लवकर अद्ययावत आधार आणि बँक पासबुकच्या छायांकित प्रती ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडे सुपूर्त कराव्यात, जेणेकरून अनुदानाची रक्कम वेळेवर त्यांच्या खात्यात जमा होऊ शकेल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top