धुळ्यातील डीजे स्पर्धेवर पोलिसांची कारवाई; दोन डीजे वाहने जप्त, चार जणांवर गुन्हा दाखल

धुळे शहरातील पांझरा नदीकिनारी शितलामाता मंदिराजवळील रस्त्यावर दोन डीजे वाहनांकडून करण्यात येणाऱ्या कर्णकर्कश आवाजातील स्पर्धेमुळे नागरिक हैराण झाले होते. या प्रकरणाची माहिती पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना मिळताच, धुळे शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत कारवाई केली.

दि. ४ ऑगस्ट रोजी दुपारी ३:५५ वाजेच्या सुमारास डीजे वाहनांकडून मोठ्या आवाजात संगीत लावून स्पर्धा केली जात होती. या आवाजामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रार समोर आली होती. घटनास्थळी पोलीस कर्मचारी पो.कॉ. हिमांशु ठाकूर, दीपक जगताप आणि योगेश वानखेडे दाखल झाले असता, संबंधित डीजे वाहन चालकांनी तेथून पळ काढला.

तथापि, पोलिसांनी स्वखर्चातून केलेल्या तपासाद्वारे संबंधित दोन डीजे वाहने ताब्यात घेतली असून, सुमारे १० लाख रुपये किमतीची ही वाहने पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आली आहेत. जप्त करण्यात आलेल्या पहिल्या वाहनाचे चालक प्रफुल्ल पाटील (रा. बेटावद, जि. धुळे) व डीजे ऑपरेटर धनंजय नितीन लगड (रा. महेश्वरनगर, चितोड रोड, धुळे) तसेच दुसऱ्या वाहनाचे चालक राहुल दीपली चौधरी (रा. संभाजीनगर, नंदुरबार) व डीजे ऑपरेटर उमेश प्रविण चव्हाण (रा. मोगलाई, धुळे) या चारही व्यक्तींविरुद्ध पो.कॉ. हिमांशु ठाकूर यांनी सरकार तर्फे फिर्याद दाखल केली आहे.

ही कार्यवाही पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक पाटील, पोहेकॉ राहुल सोनवणे, कुंदन पटाईत, पोकॉ महेश मोरे आणि अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी केली. नागरिकांना त्रास होईल असे कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराहि यावेळी प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top