सोशल मीडियावर गुन्हेगारीचा गौरव करणाऱ्या पोस्ट्स आणि व्हिडीओंचा फैलाव रोखण्यासाठी धुळे पोलिसांनी कडक पावले उचलली असून, अशा प्रकारांमध्ये सहभागी असलेल्या तीन जणांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गुन्हेगार मयत रफिउद्दीन शेख उर्फ गुड्या व विक्रम श्यामराव गोयर उर्फ विकी बाबा गोयर यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे उदात्तीकरण करणारे व्हिडीओ व पोस्ट्स काही इंस्टाग्राम अकाऊंटवरून व्हायरल होत असल्याची माहिती सायबर पोलीस स्टेशनच्या सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलला मिळाली. यासंदर्भात पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी त्वरीत कारवाईचे आदेश दिले. पोलीस तपासात vickybabagoyarcompany, Killer_70_ आणि parwez_pathan._70 या इंस्टाग्राम हँडल्सचा वापर करून गुन्हेगारांचे उदात्तीकरण केल्याचे आढळून आले. यावरून खालील तिघांविरुद्ध भिन्न पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत:
या कारवाईत पोलिसांनी तीन आरोपींचा शोध घेऊन त्यांच्याविरोधात संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल केले आहेत. जयप्रकाश संजय देसले, रा. माळीच, ता. शिंदखेडा याच्याविरुद्ध नरडाणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविस सईद शेख, रा. जनता सोसायटी, धुळे याच्याविरोधात चाळीसगावरोड पोलीस स्टेशन येथे कारवाई करण्यात आली आहे. तसेच परवेज इस्माईल पठाण, रा. खाटकी वाडा, एकविरा देवी रोड, धुळे याच्याविरुद्ध देवपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, काही ठिकाणी जामिनावर सुटलेल्या गुन्हेगारांचे स्वागत मिरवणुकीत, डीजेच्या गजरात व शस्त्रप्रदर्शनासह केले जात आहे. या प्रकारांद्वारे समाजात भीती व दहशत पसरवण्याचा प्रयत्न होत असून, सोशल मीडियावर अशा क्लिप्स मोठ्या प्रमाणात व्हायरल केल्या जात आहेत.
सायबर पोलीसांकडून यावर बारीक नजर ठेवण्यात येत असून, अशा पोस्ट्स / व्हिडीओ शेअर करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाने सर्व नागरिकांना विनंती केली आहे की, समाजविघातक कृत्यांना खतपाणी घालणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या पोस्ट्सपासून दूर राहावे. अशा कृत्यांनी कायदा-सुव्यवस्थेचा भंग होतो आणि गुन्हेगारीला अप्रत्यक्ष पाठिंबा मिळतो. यामुळे अशा प्रकारांचा समाचार घेण्यासाठी पोलिस सज्ज असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, पो.नि. विनोद पाटील (सायबर पो.स्टे), पो.नि. सुरेशकुमार घुसर (चाळीसगाव रोड), पो.नि. समाधान वाघ (देवपूर), सपोनि. तुषार देवरे (नरडाणा), पो.उपनिरीक्षक प्रतिक कोळी, व सायबर पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सहभागातून पार पडली. पुढील तपास सुरू आहे.
