धुळे शहरात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आणि अखंड भारत संकल्प दिनानिमित्त गुरुवारी (१४ ऑगस्ट) सकाळी ९ वाजता १ हजार एकशेएकरा (११११) फूट लांबीच्या तिरंगा ध्वजाची भव्य पदयात्रा काढण्यात येणार आहे. या ऐतिहासिक पदयात्रेचे आयोजन शहराचे आमदार अनुप अग्रवाल आणि हिंदवी स्वराज्य संघटनेतर्फे करण्यात आले आहे.
ही पदयात्रा मालेगाव रोडवरील छत्रपती अग्रसेन महाराज चौक येथून सुरुवात होईल. मार्गक्रमणादरम्यान ती छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, पाचकंदील चौक आणि जुन्या आग्रा रोडमार्गे महात्मा गांधी पुतळा येथे पोहोचेल. येथे होणाऱ्या सभेत देशभक्तीची प्रेरणा देणारे आणि मिशन प्रहारचे संस्थापक, प्रख्यात कमांडो ट्रेनर व फ्रीलान्स कमांडो मेंटर ग्रँडमास्टर शिफूजी शौर्य भारद्वाज आणि आमदार अनुप अग्रवाल मार्गदर्शन करतील. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने होईल.
या पदयात्रेत जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील यांच्यासह शहरातील विविध राजकीय पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्था-संघटनांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. तसेच शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांचे विद्यार्थी आणि धुळेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. आमदार अग्रवाल आणि हिंदवी स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष ॲड. रोहित चांदोडे यांनी सर्व धुळेकरांना या तिरंगा ध्वज पदयात्रेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या मते, ही पदयात्रा केवळ एक कार्यक्रम नसून देशभक्ती, एकात्मता आणि अखंड भारताच्या संकल्पनेला दृढ करण्याचा सामूहिक संकल्प आहे
