अवधान औद्योगिक वसाहतीत फायर स्टेशन पूर्ण, मात्र साधनसामग्रीची प्रतीक्षा

धुळे येथील अवधान औद्योगिक वसाहतीत नुकतेच बांधून पूर्ण झालेले अद्ययावत अग्निशामक केंद्र लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक दोन अग्निशामक बंब आणि प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार अनुप अग्रवाल यांनी एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे.

अवधान औद्योगिक वसाहतीत आमदार अनुप अग्रवाल यांच्या पाठपुराव्यातून एक अद्ययावत फायर स्टेशन उभारण्यात आले आहे. येथे ऑइल, केमिकल आणि वस्रोद्योगांसह ज्वलनशील पदार्थ तयार करणारे उद्योग मोठ्या प्रमाणावर आहेत. पूर्वी अनेक वेळा आगीच्या घटना घडून आर्थिक नुकसान झाले असून, भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता लक्षात घेऊन हे फायर स्टेशन बांधण्यात आले. आता हे केंद्र कार्यान्वित करण्यासाठी बी-टाइप फायर टेंडर मशिनसह दोन अग्निशामक बंब आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची तातडीची गरज आहे. सध्या आगीची घटना घडल्यास धुळे शहरातील महापालिकेच्या केंद्रातून आठ किलोमीटरवरून बंब यायला वेळ लागतो आणि त्यामुळे हानी वाढते.

या पार्श्वभूमीवर आमदार अग्रवाल यांनी औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता एस. एस. गांधिले यांच्याकडून माहिती घेतली आणि मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्वरित साधनसामग्री व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यावर अधिकाऱ्यांनी लवकरच आवश्यक ती सुविधा उपलब्ध करून देण्याची हमी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top