धुळे : गणेशोत्सवाला मूळ संस्कृतीकडे वळवण्यासाठी ‘आपला श्री गणेश उत्सव, आपली संस्कृती’ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेच्या बोधचिन्हांचे (लोगो) विमोचन धुळे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मा. सौ. भाग्यश्री विसपुते आणि महानगरपालिका आयुक्त मा. अमिता दगडे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यपूर्व काळात जनतेला संघटित करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. मात्र, सध्याच्या काळात अश्लील गाणी, डीजेचा कर्कश्य आवाज, वाहतूक कोंडी, वाद-संघर्ष आणि संस्कृतीपासून दूर गेलेले कार्यक्रम यामुळे उत्सवाचे मूळ स्वरूप हरपत चालले आहे.
हे थांबवण्यासाठी आणि उत्सवात धर्म व संस्कृतीचे जतन व्हावे, यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.
विमोचन कार्यक्रमाला संयोजक उमेश चौधरी, ह.भ.प. नानासाहेब हलोर, हिरामण आप्पा गवळी, अनिलजी मुंदडा, कमलाकरजी अहिरराव, राजेंद्र साखला, लोकेश चौधरी, सागर कोडगीर, सचिन मराठे, जितेंद्र संन्यासी, रमेश करणकाळ, विनायक बडगुजर, राहुल चौधरी, नितीन पाटील, हिरालाल चौधरी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

