‘नवरंग’च्या जागेवर सहा महिन्यांत उभारणार २५० ओट्यांचे भाजी मार्केट- आ. अनुप अग्रवाल

धुळे शहरातील देवपूरमधील दत्तमंदिर ते नगावबारीपर्यंत रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांना कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्यासाठी नवरंग जलकुंभाजवळ भाजी मंडई उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी २०० ते २५० ओटे शेड स्वरूपात तयार करण्यात येणार असून सहा महिन्यांत हा प्रकल्प उभा राहील, अशी माहिती शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी दिली.

महापालिकेच्या प्रशासकीय महासभेत आयुक्त अमिता दगडे-पाटील यांनीही या प्रस्तावाला मंजुरी देत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. यासाठी महापालिकेच्या पॅनलवरील वास्तुविशारद आनंद खैरनार यांची नियुक्ती करून अंदाजपत्रक, नकाशे व निविदा प्रपत्र तयार करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. देवपूरमधील ही जागा महापालिकेची असून मंजूर विकास योजनेत व्यापारी संकुलाचे आरक्षण आहे. याठिकाणी व्यापारी संकुलासह भाजी मंडई विकसित झाल्यास महापालिकेच्या उत्पन्नात भर पडून शहराच्या सौंदर्यीकरणालाही हातभार लागेल. आर्थिक मर्यादा लक्षात घेता हा प्रकल्प शासन निधी, जिल्हा नियोजन मंडळ, बीओटी, बीओओटी किंवा पीपीपी पद्धतीने विकसित करण्याचा विचार आहे.

याबाबत आ. अग्रवाल यांनी सांगितले कि, “शहरातील दत्तमंदिर ते नगावबारीपर्यंतच्या भाजी विक्रेत्यांसाठी जागेचा प्रश्न कायम होता. नवरंगच्या जागेवर २०० ते २५० ओटे सहा महिन्यांत उभारून सर्वांना कायमस्वरूपी व्यवस्था केली जाईल. शासनाकडून निधी मिळवण्यासाठी माझा पाठपुरावा सुरूच आहे.” तसेच आ. अग्रवाल यांनी या संदर्भात जानेवारीपासून शासन स्तरावर पाठपुरावा सुरू केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा व सहसचिव विवेक गायकवाड यांना पत्रव्यवहार केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top