धुळे : धुळे शहरातील क्रांतीसुर्य महात्मा फुले पुतळ्याजवळ महात्मा फुले समता परिषद महानगर प्रमुख उमेश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भर पावसात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनातून मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये अशी मागणी करण्यात आली.
उमेश महाजन यांनी सांगितले की,
“आधीच ओबीसीमध्ये साडेतीनशे जाती 17 टक्क्यांच्या आरक्षणात समाविष्ट आहेत. त्यात मराठा समाजाला समाविष्ट करण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवे, मात्र ते ओबीसी कोट्यातून नको.”
याआधीच मराठा समाजासाठी 10 टक्के आरक्षण देण्यात आले आहे. आता 10 ऐवजी 16 टक्के सरसकट आरक्षण द्यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. तथापि, ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षणाला समता परिषदेचा तीव्र विरोध असल्याचे उमेश महाजन यांनी स्पष्ट केले.

