धुळे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा प्रशासनाने डीजे व साऊंड सिस्टमवर घातलेली बंदी शिथिल करण्याची मागणी धुळे जिल्हा डीजे चालक-मालक संघटनेने केली आहे. या संदर्भात संघटनेने जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर केले.
संघटनेने म्हटले आहे की, “डीजे व्यवसायावरच अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. अनेकांनी या व्यवसायासाठी बँक व खाजगी कर्ज घेतलेले आहे. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करूनच आतापर्यंत हा व्यवसाय सुरू आहे. तरीही अचानक बंदी घातल्याने उपजीविकेवर गदा येत आहे.”
संघटनेने CRIMINAL WRIT PETITION No. 1568 OF 2014 आणि NOISE POLLUTION REGULATION CONTROL RULE 2000 चा हवाला देत म्हटले आहे की, “माननीय उच्च न्यायालयाने ५५ ते ६५ डेसिबल मर्यादेत डीजे वाजविण्याची परवानगी दिली आहे. मात्र, पोलिस प्रशासनाने संघटनेला विश्वासात न घेता बंदी जाहीर केली आहे, जी अन्यायकारक आहे.”
संघटनेने प्रशासनास आश्वासन दिले आहे की, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व प्रशासनाच्या मार्गदर्शनाखालीच डीजे वाजवला जाईल. त्यासोबतच विविध गणेश मंडळांनीही डीजे वाजविण्यासाठी समर्थन दिले असल्याचे संघटनेने सांगितले.
प्रतिनिधी कार्तिक सोनवणे

