राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांनी आज धुळे शहरातील क्यूमाईन क्लबसमोर थाळीनाद आंदोलन केले. १९ ऑगस्टपासून सुरू असलेल्या या बेमुदत कामबंद आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, शासनाकडून अद्याप कोणतीही दखल न घेतल्याने कर्मचारी अधिक आक्रमक झाले आहेत.
आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपल्या लहान मुलांसह थाळ्या वाजवत आणि जोरदार घोषणाबाजी करत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. ‘सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्या’ ही त्यांची प्रमुख मागणी असून, जोपर्यंत ती मान्य होत नाही तोपर्यंत ‘समान काम, समान वेतन’ लागू करावे, अशीही त्यांची अपेक्षा आहे.
शासनाकडून केवळ पोकळ आश्वासने मिळाल्याचा आरोप करत, यापुढे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ‘राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समिती’ने दिला आहे.
प्रतिनिधी कार्तिक सोनवणे

