धुळे महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांचा इशारा
धुळे (प्रतिनिधी) : धुळे महानगरपालिकेतील सफाई कर्मचारी गेल्या दोन महिन्यांपासून पगार, एक वर्षाचा पीएफ आणि बोनस थकीत असल्याने संताप व्यक्त करीत आहेत. महापालिका व संबंधित ठेकेदार याकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी थकीत वेतन त्वरित द्यावे, अन्यथा उद्यापासून बेमुदत कामबंद आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.
धुळे महानगरपालिकेच्या कचरा व्यवस्थापन डेपो येथे आज शेकडो सफाई कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचा पगार मिळालेला नाही, तर गेल्या एका वर्षापासून पीएफ व बोनसही थकलेले आहेत. यामुळे सफाई कर्मचारी आक्रमक झाले असून आंदोलनाची भूमिका घेतली आहे.
कर्मचाऱ्यांनी ठेकेदारावरही गंभीर आरोप केले. “सफाईसाठी आवश्यक साधनसामुग्री दिली जात नाही, घंटागाड्या व ट्रॅक्टर नादुरुस्त असून त्यांची देखभालही होत नाही. आम्ही जीव धोक्यात घालून शहर स्वच्छ ठेवतो, पण आमचे हक्काचे पैसेच मिळत नाहीत,” असा संताप कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.
सफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे महापालिका व ठेकेदारांनी लक्ष न दिल्यास शहरातील सफाई व्यवस्था ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

