भारतीय जनता पक्ष महिला आघाडी साक्री तालुक्यातील प्रत्येक गावात ‘गाव तेथे समन्विका’ या नाविन्यपूर्ण अभियानाची सुरुवात करीत आहे. या अभियानाद्वारे केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती महिला समन्विकांच्या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर, कामगार, युवक-युवती, महिला आणि विद्यार्थिनींपर्यंत थेट घराघरात पोहोचवली जाणार आहे.
या अभियानाची संकल्पना भाजपा महिला आघाडी तालुकाध्यक्ष अँड. पूनम शिंदे-काकुस्ते यांची असून, त्याबाबत माहिती त्यांनी साक्री शहरातील भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मंडलाध्यक्ष महेंद्र देसले, जैताणे मंडलाध्यक्ष चंद्रकांत पवार, माजी नगराध्यक्ष तथा भाजपा चिटणीस जयश्री पवार, नगरसेविका जयश्री पगारिया आदी उपस्थित होते. यावेळी अँड. काकुस्ते म्हणाल्या, “महिला विकासासाठी केंद्र आणि राज्य शासनाने ज्या योजना जाहीर केल्या आहेत, त्या प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवणे हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. साक्री तालुका हा राज्यातील पहिला तालुका ठरणार आहे, जिथून या संकल्पनेची सुरुवात होत आहे. यामुळे भाजपा महिला आघाडी अधिक सक्षम होईल.”
आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषद आणि ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांपर्यंत थेट पोहोचून भाजपच्या योजनांची माहिती देणे, हा या उपक्रमामागचा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महिला आघाडी तालुका कार्यकारिणीतील काही नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणाही करण्यात आली. त्यामध्ये तालुका महिला चिटणीस सौ. शितल साळुंखे, तालुका युवती मोर्चा अध्यक्ष करूणा पाटील, ओबीसी महिला अध्यक्ष विद्या सैंदाणे, उपाध्यक्ष शारदा योगेश्वर भामरे (विजयपूर विभाग), विद्यार्थीनी आघाडी कल्याणी सोनवणे (साक्री विभाग), विद्यार्थीनी आघाडी तनुजा जाधव(जैताणे विभाग), सोशल मीडिया प्रमुख मयुरी बोरसे, अध्यक्ष रेखा सूर्यवंशी (आदिवासी महिला मोर्चा ग्रामीण आघाडी), अध्यक्ष सपना माळचे (अनुसूचित जमाती महिला आघाडी शहरी विभाग), महिला मोर्चा प्रमुख छाया वाडेकर(पिंपळनेर मंडल), अध्यक्ष सरला पवार (महिला अध्यात्मिक आघाडी) यांचा समावेश आहे.
या उपक्रमाला बळकटी देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ, पालकमंत्री जयकुमार रावल, माजी मंत्री अमरीशभाई पटेल, खासदार डॉ. सुभाष भामरे, खासदार डॉ. हीना गावीत, आमदार अनुप अग्रवाल, मा.आ. कुणाल पाटील, जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाणे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष धरतीताई देवरे, तसेच अन्य अनेक आजी-माजी पदाधिकारी व लोकप्रतिनिधींचा सहभाग निश्चित करण्यात आला आहे.
प्रतिनिधी- निलेश सावळे
