धुळे – मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासंदर्भात काढलेला शासन निर्णय (जीआर) हा अन्यायकारक असल्याचे सांगत तो तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ओबीसी समाजाच्या विविध संघटनांनी एकत्र येत जोरदार निदर्शने केली. या वेळी शासनाविरोधात घोषणाबाजी करत ओबीसींच्या आरक्षणावर कुठलाही डल्ला न मारण्याचा इशारा देण्यात आला.
ओबीसी समाजाच्या प्रतिनिधींनी सांगितले की, “सगे सोयरे किंवा सरसकट हा आरक्षणाचा निकष नसून शैक्षणिकदृष्ट्या मागास हा आरक्षणाचा खरा निकष आहे. त्यामुळे मराठा समाज ओबीसी आरक्षणासाठी पात्र ठरत नाही. मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असल्यास ते ओबीसींच्या हक्कांवर गदा आणून देऊ नये.”
ओबीसी संघटनांच्या या निदर्शनामुळे धुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शासनाने तात्काळ जीआर मागे घ्यावा, अन्यथा पुढील तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

