निजामपूर येथे साक्षरता दिनानिमित्त विधी सेवा समितीच्या जनजागृती शिबिराचे आयोजन

साक्री तालुक्यातील निजामपूर येथे ८ सप्टेंबर रोजी साक्षरता दिनानिमित्त विधी सेवा समिती, साक्री यांच्या वतीने जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. उच्च न्यायालय मुंबईच्या आदेशान्वये आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायाधीश मुग्धा गांगुर्डे होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून निजामपूर ग्रामपंचायतीच्या सरपंच शितल शाह उपस्थित होत्या. यावेळी साक्री न्यायालयाचे सरकारी अभियोक्ता ॲड. चेतन वळवी, ॲड. डी. व्ही. माळी, ॲड. ए. एन. शेख, पोलिस उपनिरीक्षक मधुकर सोमासे, ग्रामपंचायत अधिकारी राहुल मोरे, तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक चिंधु शिंपी आणि धनराज खैरनार आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन ग्रामसेवक राहुल मोरे यांनी केले. ॲड. चेतन वळवी यांनी पीडित भरपाई योजना व विधी सेवा समितीच्या मदतीची माहिती दिली. ॲड. डी. व्ही. माळी यांनी साक्षरता दिनाचे महत्त्व, त्याची सुरुवात व उद्देश यावर ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय भाषणात न्यायाधीश मुग्धा गांगुर्डे यांनी ८ सप्टेंबर साक्षरता दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच १३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या लोकन्यायालयाचे फायदे, ए.डी.आर. पद्धतीची माहिती आणि कायदेशीर जागरूकतेचे महत्त्व नागरिकांना समजावून सांगितले. व्यवहार करताना चेक व्यवहारांचे कायदेशीर पैलूही त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले. या शिबिरात निजामपूर पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, पत्रकार तसेच न्यायालयीन कर्मचारी आणि पोलिस पथकाने सहकार्य केले. आभार प्रदर्शन ग्रामसेवक राहुल मोरे यांनी केले.

प्रतिनिधी- हेमंत महाले, निजामपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top