धुळे (दि. ८) – राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी सहाय्यभूत साधने आणि कृत्रिम अवयव मोफत वाटप करण्यासाठी दोन दिवसीय मूल्य मापन शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हे शिबिर सोमवारी बर्वे स्मृती कन्या छात्रालयात सुरू झाले असून मंगळवार हा नावनोंदणीचा शेवटचा दिवस आहे.
धुळे जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र तसेच अलिम्को, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ६० वर्षांवरील वयोवृद्ध बांधवांसाठी हे शिबिर ठेवण्यात आले आहे.
सोमवारी पहिल्याच दिवशी १०० हून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी नावनोंदणी केली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजीज शेख यांनी शिबिराला भेट देऊन पाहणी केली. यावेळी प्रकल्प संचालक कृष्णा शिरसाठ यांनी योजनेचा उद्देश, प्रक्रिया व लाभार्थ्यांना होणारा फायदा याबाबत सविस्तर माहिती दिली.
या वेळी अलिम्कोचे प्रतिनिधी डॉ. संकेत व हर्ष, समाजकल्याण अधिकारी नितीन खंडेराय, दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी मालसिंग पावरा, नमो दिव्यांग अभियानाचे भूषण मराठे, रमेश अण्णा दाणे, सौ. राजेश्वरी पाटील, आर्या वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिरादरम्यान वयोवृद्ध नागरिकांचे मोजमाप घेऊन १८ प्रकारची सहाय्यभूत साधने जसे की चालण्यासाठी काठ्या, कुबड्या, वॉकर, श्रवणयंत्र, घडीच्या खुर्च्या, कमोड खुर्च्या, पाठपट्टा, मानेचा पट्टा, कंबरेचा पट्टा, गुडघ्याचा पट्टा आदी कृत्रिम अवयव मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांचे दैनंदिन जीवन सुलभ व्हावे, ते परावलंबी न राहता अधिक आरामदायी जीवन जगू शकावेत हा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. जिल्ह्यातील वयोवृद्ध नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

